
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंग आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला आता आणखी दोन न्यायाधीश मिळाले आहेत. कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी या नियुक्त्यांची घोषणा केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने यापूर्वी या दोन न्यायाधीशांच्या पदोन्नतीची शिफारस केली होती. या दोन नियुक्त्यांसह, सर्वोच्च न्यायालयात हिंदुस्थानचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासह 34 न्यायाधीशांचे मंजूर संख्याबळ आहे.
न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंग हे सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती झालेले मणिपूरचे पहिले न्यायाधीश आहेत. ते सध्या जम्मू-कश्मीर आणि लडाखचे मुख्य न्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती सिंग हे मणिपूरचे पहिले ॲडव्होकेट जनरल एन इबोतोम्बी सिंग यांचे पुत्र आहेत. किरोरी माल कॉलेज आणि कॅम्पस लॉ सेंटर, दिल्ली विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी 1986 मध्ये वकील म्हणून कारकीर्द सुरू केली. न्यायाधीश होण्यापूर्वी त्यांनी मणिपूरचे अॅडव्होकेट जनरल म्हणूनही काम केले आहे. त्यांनी गुवाहाटी उच्च न्यायालय आणि मणिपूर उच्च न्यायालयात काम केले आहे.
न्यायमूर्ती महादेवन हे सध्या मद्रास उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश आहेत. चेन्नई येथे जन्मलेले न्यायमूर्ती महादेवन हे मद्रास लॉ कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. वकील म्हणून, त्यांनी 9,000 हून अधिक प्रकरणांमध्ये हजेरी लावली आहे आणि तमिळनाडू सरकारसाठी अतिरिक्त सरकारी वकील (कर), अतिरिक्त केंद्र सरकारचे स्थायी वकील आणि मद्रास उच्च न्यायालयात केंद्र सरकारसाठी वरिष्ठ पॅनेल वकील म्हणून काम केले आहे. 2013 मध्ये त्यांची मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली.