वरळी हिट अॅण्ड रन प्रकरण : मिहीर शहा याला 30 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सहा दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने मिहीरला शिवडी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज मुंबई उच्च न्यायालयाने 30 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मिंधे गटाचा पालघर येथील उपनेता राजेश शहाचा मुलगा मिहीर शहाने 7 जुलै रोजी पहाटे दारूच्या नशेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवत एका दाम्पत्याला उडवले होते. वरळीतील मच्छी विक्रेत्या कावेरी नाखवा आणि त्यांचे पती प्रदीप नाखवा या दोघांना त्यांच्या कारने उडवले होते. त्यात प्रदीप नाखवा एका बाजूला जाऊन पडले तर कावेरी नाखवा यांना आरोपी मिहीरने फक्त गाडीखाली चिरडले नाही तर पुन्हा दोन ते अडीच किलोमीटर फरफटत नेले होते. तेवढय़ावरच न थांबता तो घटनास्थळावरून पळून गेला. अखेर 9 जुलै रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला आज न्यायालयात हजर केले होते.