जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कारातील एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले. जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांनंतर विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरले आहे. आता जम्मू-काश्मीरमधील पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सडकून टीका केली आहे. संपूर्ण देशातून जवान काश्मीरमध्ये ड्युटीसाठी येतात. आणि आता इथून ते शवपेट्यांमधून रवाना होत आहेत, असे म्हणत मेहबूबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
जम्मू-काश्मीरच्या डोडा विभागातील डेस्सा जिल्ह्यात उड्डन बागी आणि डेहरीतील जंगलात सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. शोध मोहीमेवर असलेल्या जवानांनावर जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. जवानांनी गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी पळून गेले. पण या हल्ल्यात लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह पाच जवान जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यासह तीन जवानांनी प्राण सोडले. तर गंभीर जखमी असलेल्या जवानावर उपचार सुरू आहेत. या घटनेने संतप्त झालेल्या पीडीपीच्या नेत्या मेहमूबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारला फैलावर घेतले.
काय म्हणाल्या मेहबूबा मुफ्ती?
संपूर्ण देशातून जवान आपली ड्युटी करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये येतात. पण आता इथून ते शवपेट्यांमधून जात आहेत. याला जबाबदार कोण? तुम्ही म्हणता जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपला आहे, मग हे काय सुरू आहे? जम्मूमध्ये इतके जवान का शहीद होत आहेत? संरक्षणमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे. जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.
नवीन डीजीपी आल्याने गेल्या 32 महिन्यांत सर्वाधिक जवान शहीद झाले आहेत. सीमेवर कोण तैनात आहे? पत्रकार, काश्मिरी की मुसलमान आहेत की उद्योगपती आहे? सीमेची सुरक्षा तुम्हीच करता ना? मग दहशतवाद्यांना रोखण्याची जबाबदारी कोणाची आहे? प्रादेशिक पक्षांची आहे का? उमर अब्दुल्लांची, मेहबूबा मुफ्तींची आहे का? पाकिस्तानाचे गुणगाण गात असल्याचा उठसूट आरोप माझ्यावर करत असतात. तुमचे नरेटिव्ह गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. काय मिळवलं त्यातून? उत्तर काश्मीरमध्ये तुमच्या कानशीलात बसली आहे, असा सणसणीत टोला मेहबूबा मुफ्ती यांनी लगावला.