
>>सूरज बागडे, भंडारा
भंडारा शहरात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असून त्यांच्या प्रश्नांकडे प्रशासन दूर्लक्ष्य करत आहेत. अशावेळी पालकमंत्री विजयकुमार गावित हे गायब आहे. त्यामुळे विजयकुमार गावित बेपत्ता असल्याची तक्रारच पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासकीय कामावर कुठेही नियंत्रण नसून सारी कामे ही ‘राम भरोसे’ सुरू असल्याचं चित्र आहे. शासकीय यंत्रणेमध्ये अधिकाऱ्यांनी मनमर्जी प्रमाणे वागत असल्याने जिल्ह्याच्या विकास कामांना मोठा फटका बसत आहे. तर दुसरीकडे सामान्य माणसांच्या प्रश्नांची साधी दखल देखील अधिकारी वर्गाकडून घेतली जात नसल्याने सामान्य व्यक्तीने कुणाकडे दाद मागायला जायचं असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्रीही जागेवर नसल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्री विजयकुमार गावित हे बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे.
शासनाच्या तिजोरीतील घोटाळा करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध दिलेल्या तक्रारीला जिल्हाधिकाऱ्यांनी केचराच्या टोपलीत टाकल्या दाखवल्याचा आरोप अजय मेश्राम यांनी केला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून साधी कार्यवाही देखील करीत नाहीत,
जिल्हा पातळी वरील अनेक तक्रारी असून देखील आमचे पालकत्व स्वीकारलेले विजयकुमार गावित यांना मी स्वत: 26 जानेवारीला भेट घेतली होती. तेव्हा पासून आमचे पालकमंत्री हे भंडाऱ्यातून बेपत्ता झाल्याने आमचा पालकमंत्र्यांशी कोणताही संवाद झाला नाही. पालकमंत्री साहेब बेपत्ता असल्याने भंडारा जिल्ह्याचा विकास खुंटला असून बेपत्ता असलेले आमचे पालकमंत्री मोहदयांना शोधून माझा संवाद घालून देण्यासंबंधी पोलीस स्टेशनला बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी दाखल केली आहे.