साताऱ्यात दोन चोरट्यांकडून 26 गुन्ह्यांची उकल, 39 लाखांचे 54 तोळे सोने जप्त

ज्येष्ठ नागरिक व महिलांवर हल्ले करून दरोडा व जबरी चोरी करणाऱया टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 26 गुह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. सुमारे 39 लाखांचे 54 तोळे सोन्याचे दागिनेही त्यांच्याकडून हस्तगत केले. सराफ व्यावसायिकांना सोने विकणारा तसेच आणखी काही जण फरार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी सांगितले.

शेख सुरेश भोसले (वय 27, रा. खामगाव ता. फलटण) याला अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. फलटण आणि सातारा तालुक्यात 2023 पासून दरोडा, चोरी, घरफोडी असे गुन्हे वारंवार घडत होते. ऑक्टोबर 2023 मध्ये मालगाव येथील शेतात राहत असणाऱया एका वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण करून त्यांच्याकडून दागिने चोरून नेले होते. लोणंद पोलीस ठाणे हद्दीत जून 2024 मध्ये दोन महिलांना मारहाण करून चोरीची घटना घडली होती. या दोन्ही घटनांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करीत होते. शेख भोसले हा या दोन्ही गुह्यांत आरोपी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या पथकाच्या मदतीने फलटण भागात सापळा लावण्यात आला.

संशयित शेख भोसले हा फलटण येथे येताच त्याला पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन संशयित आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी ज्येष्ठ नागरिक व महिलांकर हल्ले केले असल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून दरोडा, 23 जबरी चोरी, घरफोडी, चोरी असे 26 गुन्हे उघडकीस आले. यानंतर सराफांना विकलेला चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.

जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, साबीर मुल्ला, मुनीर मुल्ला, धीरज महाडिक, मंगेश महाडिक, अमित सपकाळ, प्रमोद साकंत, मोहसीन मोमीन, कैभक साकंत, पंकज बेसव आदींनी या कारवाईत भाग घेतला.

रेकॉर्डब्रेक सोने हस्तगत

नोव्हेंबर 2022 पासून स्थानिक गुन्हे शाखेने 311 गुन्हे उघडकीस आणले आहेत. 7 किलो 205 ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. त्याची किंमत तब्बल 5 कोटी 4 लाख 96 हजार 500 इतकी आहे. रेकॉर्डब्रेक सोने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचा हातखंडा आहे.