इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त कश्मीर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वादग्रस्त विधानाने संताप

धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त कश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला, असे वादग्रस्त विधान भाजपाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली असून, सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती समारंभाचे आयोजन आज सांगली जिह्यातील वाळवा येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने निवडून आले आहेत, त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजीला थेट ‘पाकव्याप्त कश्मीर’ म्हणून उपमा दिल्याने खळबळ उडाली आहे. आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

खऱया अर्थाने धैर्यशील माने यांनी वादळात दिवा लावला आहे, सांगत हर्षवर्धन पाटील म्हणाले, धैर्यशील माने म्हणाले मी आज विमानाने नाही तर मोटारीने आलो आहे. मी तर असं म्हणेन पुढच्या वेळेस मोटरसायकलवरून या आणि त्याच्या पुढच्या वेळेस सायकल घेऊन या! सर्वसामान्य माणसांत मिसळण्याचे हेच एकमेव साधन आहे.

सूतनगरी म्हणून संपूर्ण राज्यात नव्हे, तर देशात लौकिक असणाऱया इचलकरंजी शहराला आणि या मतदारसंघाची पाकव्याप्त कश्मीरशी तुलना केल्याने इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील मतदारांकडून संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी हर्षवर्धन पाटील यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या या वक्तव्यावरून समाज माध्यमातून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.