महाराष्ट्रातील सरकार पाडले हा जनमताचा अनादर; ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे परखड मत

उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला, दगा देणारे हिंदू असू शकत नाहीत!

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांचे सहकुटुंब आशीर्वाद घेतले. या भेटीनंतर शंकराचार्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील सरकार पाडले हा जनमताचा अनादर आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोठा विश्वासघात झाला, त्याबद्दल आपल्या मनात मोठे दुःख आहे, उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होवोत, अशा भावना शंकराचार्यांनी यावेळी व्यक्त केल्या. उद्धव ठाकरे यांना दगा देणारे हिंदू असू शकत नाहीत, असे म्हणत शंकराचार्यांनी यावेळी भाजपलाही जोरदार चपराक लगावली.

शंकराचार्य स्वामी अविमुत्तेश्वरानंद यांना माध्यमांनी यावेळी मातोश्री भेटीमागचे कारण विचारले तसेच या भेटीमध्ये नेमके काय घडले असे विचारले. त्यावर बोलताना शंकराचार्य म्हणाले की, गुरुजन घरी येतात तेव्हा त्यांच्या पादुकांचे पूजन केले जाते अशी परंपरा हिंदू धर्मात आहे. त्याचेच पालन उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आणि विधिवत केले, असे शंकराचार्य म्हणाले.

शंकराचार्य पुढे म्हणाले की, आम्ही सनातन हिंदू धर्माचे पालन करणारे लोक आहोत. हिंदू धर्मात पाप-पुण्याची कल्पना मांडली गेली आहे. कोणाचाही घात करणे हे पाप आहे आणि विश्वासघात हा हिंदू धर्मात सर्वात मोठा घात मानला जातो. उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झालेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून आपण मातोश्रीवर आलो. सहवेदना व्यक्त केल्या. तुम्ही पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसत नाही, तोपर्यंत आमच्या मनातील दुःख दूर होणार नाही, असे आपण उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यावर तुमच्या आशीर्वादाने कार्य करत राहू, असे उद्धव ठाकरे आपल्याला म्हणाले, असे शंकराचार्यांनी सांगितले.

पाप-पुण्यावर धर्माचार्यच बोलू शकतात

 “मी शंकराचार्य असलो तरी जे सत्य आहे, तेच मी बोलणार. राजकारणाशी माझे देणेघेणे नाही. पण हिंदू धर्मात पाप-पुण्य या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्यामुळे या विषयावर राजकीय नेता नाही तर धर्माचार्यच बोलू शकतो, असे  स्वामी अविमुत्तेश्वरानंद  म्हणाले.

केदारनाथमधून 228 किलो सोने गायब झाले, त्याला जबाबदार कोण?

हिंदूंच्या धर्मस्थानात राजकारणी प्रवेश करत आहेत. केदारनाथमध्ये 228 किलो सोन्याचा घोटाळा झाला. केदारनाथमधून सोने गायब केले गेले. त्याबद्दल प्रसारमाध्यमे का बोलत नाहीत? त्याची चौकशी का केली जात नाही? कोण जबाबदार आहे त्याला? असा सवाल करतानाच, आता पुन्हा दुसरा घोटाळा करण्यासाठी दिल्लीला केदारनाथ धाम बनवताय का? अशीही विचारणा शंकराचार्य यांनी केली.

नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच शंकराचार्य स्वामी अविमुत्तेश्वरानंद यांची भेट घेतली होती. त्यावरून माध्यमांनी प्रश्न केला असता शंकराचार्य म्हणाले की, जो आमच्याकडे येतो त्याला आम्ही आशीर्वाद देतो, नरेंद्र मोदी आमचे दुश्मन नाहीत आणि त्यांच्याकडून काही चूक झाली तरी आम्ही त्यांना विचारणा करतो.

प्रतिकात्मक केदारनाथ बनले जाऊ शकत नाही

दिल्लीमध्ये प्रतिकात्मक केदारनाथ मंदिर बनवले जातेय. त्याबद्दल बोलताना शंकराचार्य म्हणाले की, प्रतिकात्मक केदारनाथ बनवले जाऊ शकत नाही. हिंदू धर्मात शिवपुराणात द्वादश ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आहे. बारा ज्योतिर्लिंगांची नावे आणि त्यांची स्थाने सांगितली गेली आहेत. जसे सौराष्ट्रे सोमनाथम…म्हणजेच सोमनाथ सौराष्ट्रात आहे. तसेच केदारम हिमवत पृष्ठे… म्हणजेच केदारनाथ हिमालयाच्या पृष्ठभागावर आहे. हिमालयात केदार आहे तर दिल्लीत कसे आणणार? स्थान बदलले गेलेय तर सरकार त्याचे लोकेशन कसे बदलू शकते? का जनतेला भ्रमात टाकता? असा सवाल शंकराचार्य यांनी केला. केदारनाथांच्या नावाने स्थापना करून पूजा करा, पण केदारनाथ धाम दिल्लीत बनवणार ही चेष्टा आहे, असे ते म्हणाले.

मी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलेच बोललो

तुमच्या माध्यमातून काही राजकीय चर्चा झाली का असा सवाल माध्यमांनी केला असता, आपण काही लायझनर नाही असे शंकराचार्य म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी श्रद्धापूर्वक बोलवले आणि आम्ही आलो आणि माध्यमांशी मी बोललो ते माझ्या मनातील आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील बोललो.

हिंदुत्व कोणाचे असली आणि कोणाचे नकली हे जाणून घ्यावे लागेल

आमचे हिंदुत्व असली आहे असा दावा भाजप नेते करतात, असे यावेळी माध्यमांनी शंकराचार्यांना विचारले. त्यावर, कोणाचे हिंदुत्व असली आहे आणि कोणाचे नकली हे जाणून घ्यावे लागेल. विश्वासघात करणारे हिंदू असूच शकत नाहीत, जो विश्वासघात सहन करतो तो हिंदूच असणार. कारण त्याच्याशी विश्वासघात झालेला असतो, असे शंकराचार्य म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या विश्वासघाताचे दुःख महाराष्ट्रातील जनतेच्या मनातही आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ते सिद्धही झाले. सर्व जनता मानते की उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. विश्वासघात करणाऱ्यांनी जनतेचाही अनादर केला. मधेच सरकार पाडणे आणि जनमताचा अनादर करणे योग्य नाही.

 शंकराचार्य स्वामी अविमुत्तेश्वरानंद

मिंधे सरकारला ना संविधानाची ना धर्माची मान्यता!  नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी तसेच भरत गोगावले यांची व्हीपपदी केलेली नियुक्ती बेकायदा असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला असे विधान हिंदू धर्माचे शंकराचार्य स्वामी अविमुत्तेश्वरानंद यांनी केले. या दोन्ही घटनांवरून नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर मिंधे सरकारवर टीका केली आहे. मिंधे सरकारने सत्तेवर येण्यासाठी संविधान असो वा धर्मशास्त्र, दोन्हींच्या तत्वांचे उल्लंघन केले. त्यावरून नेटकऱ्यांनी मिंधे सरकारला ना संविधानाची ना धर्माची मान्यता अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. बरोबरच दोन्ही घटनांच्या बातम्यांचा दाखलाही नेटकऱ्यांनी दिला आहे.

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सोमवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शंकराचार्यांच्या पादुकांचे विधीवत पूजन करण्यात आले. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यावेळी उपस्थित होते.