महागाईने गाठला 16 महिन्यांचा उच्चांक; मोदी है तो महंगाई है…खाद्य पदार्थ, भाज्या, कडधान्ये कडाडली… 

जून महिन्यात महागाईने तब्बल 16 महिन्यांतील उच्चांक गाठल्याचे घाऊक किंमत निर्देशांकाच्या माध्यमातून समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांत खाद्यपदार्थ, भाज्या, कडधान्ये कडाडली असून इंधनाचे दरही गगनाला भिडलेले आहेत. 15 जुलै रोजी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जूनमध्ये घाऊक महागाई 3.36 टक्क्यांपर्यंत वाढली असून फेब्रुवारी 2023 मध्ये घाऊक महागाई दर 3.85 टक्के इतका होता. त्यामुळे महागाई आटोक्यात आणण्याचे आणि इंधन दर कमी करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी पुन्हा एकदा बोगस निघाल्याचेच सिद्ध झाले आहे.

मे महिन्यात घाऊक महागाई 2.61 टक्क्यांसह 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. याआधी एप्रिल 2024 मध्ये महागाई 1.26 टक्के होती, जी 13 महिन्यांतील सर्वोच्च पातळी होती. दरम्यान, गेल्या आठवडय़ात किरकोळ महागाईतही वाढ दिसून आली. भाज्यांनी डबल सेंच्युरी गाठल्याचे समोर आले. फरसबीने किलोमागे 200 रुपयांचा भाव खाल्ला तर टोमॅटोचे दरही 100 रुपये प्रति किलोवर पोहोचले.

अशी वाढली महागाई

मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये अन्नधान्य महागाई 7.40 टक्क्यांवरून 8.68 टक्क्यांपर्यंत वाढली.

दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा महागाई दर 7.20 टक्क्यांवरून 8.80 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

इंधन आणि ऊर्जेचा घाऊक महागाई दर 1.35 टक्क्यांवरून 1.03 पर्यंत कमी झाला.

उत्पादनांचा घाऊक महागाई दर 0.78 टक्क्यांवरून 1.43 टक्क्यांवर गेला.

खिशाला चाट, करकपातही नाही

घाऊक महागाई वाढल्यामुळे उत्पादन क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होत असून घाऊक किमती अधिक काळ चढय़ा राहिल्यास उत्पादक त्याचा भार ग्राहकांवर टाकतात. हीच परिस्थिती पुढील काही महिने राहू शकते, अशी भीती निर्माण झाली आहे, तर सरकारकडून करकपात होत नसल्याने ग्राहकांच्या खिशाला चाट पडणार आहे.

कडधान्ये   आधी     आता

चवळी       100       120

मटार 80   120

तूर डाळ    120       180

चणा डाळ  72  90

मूग डाळ    100       120

साबुदाणा   50  70

साखर 40   44

शेंगदाणा    100       120

गहू    28   35

तांदूळ 40   50