
गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी महाबळेश्वरजवळील 620 एकर जमिनीवर विस्तारलेले अख्खे गाव खरेदी केल्याच्या प्रकाराची राष्ट्रीय हरित लवादाने दखल घेतली आहे. लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वन मंत्रालयाचे प्रादेशिक कार्यालय, मुख्य वनसंरक्षक व सातारा जिल्हाधिकाऱयांना नोटीस बजावली आहे. चंद्रकांत वळवी व नातेवाईकांनी कांदाटी खोऱयातील झाडानी गाव विकत घेतल्याचा आरोप आहे. ही जमीन सरकारद्वारे अधिग्रहित केली जात असून संपादन प्रक्रियेच्या वैधतेबाबत शंका उपस्थित केली जात आहे. यासंदर्भात प्रसिद्ध बातमीची हरित लवादाने गंभीर दखल घेतली. वळवी यांनी जमीन खरेदीनंतर परिसरात सुरू केलेली बेकायदेशीर बांधकामे, खोदकाम, झाडे तोडणे, रस्तेकाम, वनक्षेत्रातून होणारा पाणीपुरवठा यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्याचे लवादाच्या निदर्शनास आले आहे. याप्रकरणी 6 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.