बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणी म्हाडाची ‘वेट ऍण्ड वॉच’ची भूमिका, पालिकेच्या निर्णयानंतरच पुढील कारवाईची दिशा

म्हाडाच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभ्या असलेल्या हार्ंडग प्रकरणी म्हाडाने सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. बेकायदेशीर होर्डिंगबाबत पालिकेच्या निर्णयानंतर म्हाडा कारवाईची दिशा ठरवणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी बेकायदेशीर होर्डिंगला अभय मिळाले आहे.

घाटकोपर येथील हार्ंडग दुर्घटनेनंतर शहरातील बेकायदेशीररित्या उभ्या राहिलेल्या होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या म्हाडाने आपल्या जमिनीवरील होर्डिंगचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात म्हाडाच्या जागेवरील 62 पैकी 60 हार्ंडगसाठी प्राधिकरणाची एनओसी घेतली नसल्याचे समोर आले. त्यानंतर म्हाडाने धडक कारवाई करत तत्काळ शहरातील दोन होर्डिंग हटवले.

म्हाडाच्या एनओसीशिवाय पालिकेचा परवाना

होर्डिंग उभारण्यासाठी पालिकेचा परवाना आवश्यक असली तरी जागामालक म्हणून म्हाडाची एनओसी घेणे बंधनकारक आहे. एनओसीशिवाय उभारलेले होर्डिंग म्हाडाच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत. मात्र म्हाडाच्या एनओसीशिवाय पालिकेने सदर जाहिरात कंपन्यांना होर्डिंग उभारण्यासाठी परवाना दिल्यामुळे म्हाडाची गोची झाली आहे. पालिकेने रीतसर सुनावणी घेऊन परवाना रद्द केल्यानंतरच संबंधित हार्ंडग कोणत्याही कायदेशीर अडथळ्यांशिवाय तोडणे शक्य होईल, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.