सामना अग्रलेख – खोट्याच्याच कपाळी गोटा; बुडाखालचे ‘सत्य’

सत्ताधाऱ्यांचा खोटेपणा जनतेसमोर आणणे हे लोकशाहीत विरोधकांचे कर्तव्यच असते. तेच विरोधकांनी केले. त्यामुळे तुम्ही निर्माण केलेलाभ्रमाचा भोपळाफुटला आणि तुमचा बहुमताचा फुगा बहुमताच्या अलीकडेच अडकला. त्यामुळेच तुमचीखोटे नरेटिव्हची फडफड सुरू आहे. अर्थमंत्री सीतारामनबाईंनीही चंदिगडमध्ये तीच फडफड केली आणि राममंदिराबाबत काँग्रेसने खोटे पसरविले अशी तबकडी वाजवली. मग अयोध्येनंतर बद्रिनाथ येथेही तुमचा पराभव का झाला? तुमचा दहा वर्षांतील खोटेपणा आता जनतेच्याच पुरता लक्षात आला आहे. तेव्हा विरोधकांच्या नावाने बोटे मोडणे सोडा. ‘खोट्याच्याच कपाळी गोटाअसतो हे तुमच्या बुडाखालचेसत्यआधी बघा.

लोकसभेपाठोपाठ गेल्या आठवडय़ात झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही ‘इंडिया आघाडी’चाच डंका वाजला. जनतेने येथेही भाजपच्या पेकाटात लाथच हाणली. बहुदा त्यामुळेच ‘खोटे पसरविले’चे तुणतुणे ती मंडळी उठता बसता वाजवीत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही रविवारी काँग्रेसवर टीका करताना हेच तुणतुणे वाजविले. चंदिगड भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सीतारामनबाईंनी हा ‘खोट्या’चा राग आळवला. ‘खोटी विधाने करून आणि भाजपविरोधात खोटे नरेटिव्ह पसरवून काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी जनतेत संभ्रम निर्माण केला. आजही त्यांचे तेच उद्योग सुरू आहेत,’ असे अर्थमंत्री म्हणाल्या. राममंदिराबाबत काँग्रेसने खोटे पसरविले असेही त्या म्हणाल्या. अयोध्येतील पराभवाचा राग भाजपवाल्यांच्या मनात कायम आहे, असाच याचा अर्थ. मात्र तुम्हाला अयोध्येतही प्रभू श्रीराम पावले नाहीत, त्याचे खापर तुम्ही किती काळ दुसऱ्यांवर फोडणार आहात? अयोध्येतील राममंदिर निर्माणाचे राजकारण करण्याचा खोटेपणा तुम्हीच करीत होतात. ही बनवाबनवी तेथील जनतेने ओळखली आणि तिने तुमच्या उमेदवाराला पराभूत करून प्रभू श्रीरामांप्रमाणे ‘सत्याची कास’ धरली. हेच

अयोध्येतील ‘वास्तव’

आहे. ते मान्य करा. वाराणसीमध्येही तुमची ‘झाकली मूठ दीड लाखाची’ राहिली म्हणून. नाहीतर तेथेही तुमचे ‘सत्य’ उघड होणारच होते. अर्थात, स्वतःचे अपयश आणि त्याची कारणे मान्य करण्याऐवजी दुसऱ्यांच्या नावाने बोटे मोडण्याची भाजपची जुनीच सवय आहे. म्हणूनच दिल्लीपासून गल्लीपर्यंत मिळेल तेथे ही मंडळी ‘खोटे नरेटिव्ह’च्या पिपाण्या वाजवीत फिरत आहेत. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनीही मुंबईत तेच केले. कार्यक्रम होता भूमिपूजन, उद्घाटनांचा; परंतु मोदींनीही पिपाणी वाजवली ती ‘खोट्या नरेटिव्ह’ची. खोटे नरेटिव्ह सेट करणारे देशाच्या विकासाचे, गुंतवणुकीचे दुश्मन आहेत, असे मोदी म्हणाले. काँग्रेस पक्ष जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे गुंतवणुकीचा आणि विकासाचा शत्रू असता तर तुमच्या सत्तेपूर्वी देशाने प्रगतीची नवनवीन शिखरे गाठलीच नसती. आज तुम्ही जो विकासाचा दिंडोरा पिटत आहात त्याचा भक्कम पाया काँग्रेस राजवटींतच रचला गेला. हे तुम्हाला मान्य नसेल. तुम्ही विसरला असाल, परंतु जनता विसरलेली नाही. देशाचा खरा विकास फक्त आणि फक्त 2014 नंतरच झाला, हा ‘भ्रम’ तुम्ही गेली 10 वर्षे जाणीवपूर्वक जनतेवर बिंबवण्याचा प्रयत्न केला. मात्र

त्यातील फोलपणा

जनतेने ओळखला. या वेळी जनता त्याला फसली नाही. मागील दोन निवडणुकांमध्ये झालेली चूक तिने सुधारली आणि तुमचा हाच खोटेपणा विरोधकांनी जनतेसमोर आणला तर त्यांच्या नावाने शिमगा करण्याची गरज नाही. सत्ताधाऱ्यांचा खोटेपणा जनतेसमोर आणणे हे लोकशाहीत विरोधकांचे कर्तव्यच असते. तेच विरोधकांनी केले. त्यामुळे तुम्ही निर्माण केलेला ‘भ्रमाचा भोपळा’ फुटला आणि तुमचा बहुमताचा फुगा बहुमताच्या अलीकडेच अडकला. त्यामुळेच तुमची तडफड होत आहे आणि ‘खोटे नरेटिव्ह’ची फडफड सुरू आहे. अर्थमंत्री सीतारामनबाईंनीही चंदिगडमध्ये तीच फडफड केली आणि राममंदिराबाबत काँग्रेसने खोटे पसरविले अशी तबकडी वाजवली. मग अयोध्येनंतर बद्रिनाथ येथेही तुमचा पराभव का झाला? लोकसभेपासून तुमचा सर्वत्र पराभवच होत आहे आणि पुढेही होत राहणार आहे. कारण तुमचा दहा वर्षांतील खोटेपणा आता जनतेच्याच पुरता लक्षात आला आहे. तेव्हा विरोधकांच्या नावाने बोटे मोडणे सोडा. ‘खोट्याच्याच कपाळी गोटा’ असतो हे तुमच्या बुडाखालचे ‘सत्य’ आधी बघा. ते मान्य करण्याची हिंमत दाखवा!