
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. ओबीसींसाठी आंदोलन करणारे प्रा. लक्ष्मण हाके यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीसोबत ते बोलत होते.
आम्ही आंदोलन मागे घ्यावं म्हणून सरकारकडून मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला आश्वासनं देण्यात आली नाही. मात्र यातील एकही आश्वासन पाळण्यात आल्याचं दिसत नाही, असं प्रा. हाके म्हणाले. आत्ताच्या मुख्यमंत्र्यांवर आम्हाला एक टक्क्याचाही विश्वास नाही. कारण शासनाच्या संरक्षणात कुणब्यांच्या सर्टिफिकेटद्वारे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट या मुख्यमंत्र्यांनी घातलेला आहे. आमच्या व्हीजेएनटीच्या माणसाला सर्टिफिकेट काढण्यासाठी दोन तीन महिने जातात. पण शासन टेबल लावून सर्टिफिकेट कसं देऊ शकतं? हा अधिकार शासनाला दिला कुणी?, असा सवाल प्रा. हाके यांनी केला आहे.
सामान्य नागरिकानं अर्ज करायचा असतो मग त्याची स्क्रुटिनी केली जाते आणि मग ते सर्टिफिकेट मिळतं आणि आता मात्र सर्टिफिकेट वाटले जात आहे, असा आरोप प्रा. हाके यांनी मिंधे सरकारवर केला आहे.