
विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात केलेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. यावेळी शिवभक्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावर सोमवारी संभाजीराजे छत्रपती आज शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, शिवभक्तांवर गुन्हा नोंदवून त्यांना जबाबदार धरण्यापेक्षा मला जबाबदार धरा आणि माझ्यावर गुन्हा नोंदवा. माझ्यावर गुन्हा नोंदवण्यात आला की नाही यावर पोलिसांकडून काहीच माहिती देण्यात आली नसल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठीच आलो होतो. माझ्याविरोधात गुन्हा नोंदवल्याने माध्यमांनी मला त्याबाबत विचारले, कायदा सुव्यवस्था मानणारा हा संभाजीराजे छत्रपती आहे आणि आपण काही करण्यापेक्षा आपण स्वत: हजर राहिलेले बरे. म्हणून मी शाहूवाडी पोलीस ठाण्यात आलो होतो. विशाळगड अतिक्रमणाला हिंसक वळण लागल्याप्रकरणी अनेक शिवभक्तांवर गुन्हा नोंद केलेला आहे. मात्र त्यांना जबाबदार धरण्यापेक्षा तुम्ही मला जबाबदार धरा आणि माझ्यावरच गुन्हा नोंद करा असे मी त्यांना सांगितले आहे. मग अनेक तास दीड तास सविस्तर चर्चा झाली. त्यात मी त्यांना सारखे विचारत होतो माझ्यावर गुन्हा नोंद झाला आहे का? त्यांनी शेवटपर्यंत त्याचे उत्तर दिले नाही. आता हे नेमके काय आहे याची मला कल्पना नाही आहे. आता परत निघण्यापूर्वी मी त्यांना म्हंटले की माझ्यावर गुन्हा नोंदवला असेल तर मला आताच सांगा, मला कोल्हापूरला जायची गरज नाही मी इथेच हजर राहतो.मात्र, ते एवढेच म्हणाले की आम्ही यावर काहीच बोलू शकत नाही.
विशाळगडावर आता अतिक्रमण हटविण्याचे काम सुरु आहे. असिस्टंट एसपी यांनीही याबाबत मला सांगितले की, विशाळगडावर ज्यांचे अतिक्रमण आहे, त्यांचे अतिक्रमण हटवले पाहिजे. त्याची सुरुवात आजपासून सुरु झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.