
ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी मुंबईतील मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकारणाबाबत खेद व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत दु:ख हलकं होणार नाही, अशी प्रतिक्रिया ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी दिली. कोणाचं हिंदुत्व खरं आहे, हे समजून घ्यावे लागेल, पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो, असे परखड मतही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केले.
आपण सगळे हिंदू आणि सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. पाप-पुण्याची भावना आपल्याकडे आहे. सगळ्यात मोठा धोका आणि घात म्हणजे विश्वासघात असतो. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. याबाबत अनेकांना दुःख आहे. त्यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार आपण मातोश्रीवर आलो आहोत. त्यांनी माझे स्वागत केले. मी त्यांना सांगितले जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर खुर्चीवर परत बसत नाहीत, तोपर्यंत जनतेच्या मनातील दुःख कमी होणार नाही. कोणाचं हिंदूत्व खरं हे समजून घ्यावे लागेल. पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असतो, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात झाला आहे, तसेच जनतेचाही अपमान करण्यात आलेला आहे, जनमताचा अनादर करणे हे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीत केदारनाथ बनवणार म्हणजे तिथे सुद्धा घोटाळा करणार?
प्रतिकात्मक केदारनाथ मंदिर दिल्लीत बनवणे योग्य नाही. बारा ज्योतिर्लिंग असलेल्या ठिकाणीच त्यांचे मंदिर आहेत. केदारनाथ म्हणजे केदार हा हिमालयाच्या पृष्ठभागावर आहे, असा उल्लेख पुराणात आहे. केदार जर हिमालयात आहे तर तुम्ही दिल्लीत का आणताय? केदारनाथ दिल्लीत बनवणं ही एक चेष्टा आहे. आता दिल्लीत केदारनाथ बनवणार म्हणजे तिथे सुद्धा घोटाळा करणार? असा रोखठोक सवालही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केला आहे.
जो कोणी प्रणाम करतो त्याला आम्ही आशीर्वाद देतो
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, नरेंद्र मोदी माझ्यासमोर आले आणि त्यांनी मला प्रणाम केला. आमचा नियम आहे जो कोणी प्रणाम करतो, त्याला आम्ही आशीर्वाद देतो. मोदी माझे दुश्मन नाहीत. आमचे कोणीही शत्रू नाही. आम्ही सर्वांच्या हिताबद्दलच बोलत असतो. मोदी यांच्या चांगल्यासाठीच आम्ही बोलत असतो. चूक झाली तर आम्ही त्यांना थेट चूक झाली म्हणून सांगतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.