
लोकसभा निकाल लागून दीड महिना लोटला आहे तरी लोकसभेच्या जागा आणि निकालांवरून अजूनही चर्चा सुरू आहेत. कारण देखील तसेच आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला तगडा फटका बसला ज्यामुळे देशाच्या राजकारणाचा रंगच बदलला. या निकालानंतर महायुतीतील पक्ष एकमेकांना लक्ष्य करत आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरच्या जागेसंदर्भात भाजपला निशाणा करत मोठा दावा केला आहे. यासंदर्भातील वृत्त मराठी वृत्तवाहिनीच्या संकेत स्थळानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
राज्यातील सरकार अस्थिर असल्याचं विरोधीपक्षाच्या नेत्यानं वारंवार म्हटलं आहे. तसेच अजित पवार गटातील आमदार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात परत येणार असल्याची चर्चा आहे. अनेक जण तसा दावा राजकीय पक्षांकडून केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांच्यासमवेत गेलेले आमदारही परत शरद पवार यांच्यासोबत येणार असल्याचा दावा शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. यासंदर्भात अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोणीही कुठेही जाणार नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
लोकसभा निवडणुकीनंतरही सर्वच आमदारांची बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. आता, पुन्हा एकदा या आमदारांबाबत अजित पवारांनी खासगीत बोलताना ही प्रतिक्रिया दिल्याचं एबीपी माझाच्या वृत्तात म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सातत्याने आमदार परत येणार असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडूनही असा दावा करण्यात आला होता. आता, याबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासोबत असलेले आत्ताचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, आम्ही नव्या लोकांना संधी देऊ, असे अजित पवार यांनी खासगीत बोलल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
निलेश लंके यांच्यासंदर्भात मी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र, त्यांचा विद्यमान खासदार असल्यामुळे ते जागा सोडू शकले नाहीत. ही जागा धोक्यात आहे, असंही मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं. पण, भाजपच्या नेत्यांनी ऐकलं नाही, असंही अजित पवारांनी म्हटल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.