लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपसह महायुतीला बसलेल्या दणक्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महायुतीमध्ये अजित पवार गटाला अवघी एकच जागा मिळाली आहे. त्यामुळे या गटातील नेत्यांना आता विधानसभेची धाकधूक लागली आहे. अशातच राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. त्यात छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केल्यानंतर छगन भुजबळ हे सोमवारी सकाळी अचानक पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे दाखल झाले. भुजबळ अचानक शरद पवार यांना भेट घेण्यासाठी का पोहोचले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काही दिवसांपूर्वी भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. इथेच राहणार आहे असं म्हटलं होतं. मात्र शरद पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस की अजित पवार गट हे त्यांनी काही बोलून दाखवलं नसल्यानं चर्चा सुरू आहेत. शरद पवारांसोबत झालेल्या भेटीदरम्यान भुजबळ यांनी काय संवाद साधला अशी उत्सुकता आणि विविध शक्यता माध्यमांमधून वर्तवण्यात येत आहेत.