Konkan Railway प्रवाशांसाठी मोठी अपडेट; सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली माहिती

KONKAN RAILWAY DARAD
फाइल फोटो

कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते दिवाणखवटी दरम्यान विन्हेरे भागातील मातीचा ढिगारा लवकरात लवकर हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं कोकण रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कोकण रेल्वेच्या अधिकृत हँडलवरून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र सततच्या मुसळधार पावसामुळे या प्रक्रियेत अडथळे येत असल्याचं कोकण रेल्वेच्या पोस्टमधून सांगण्यात आलं आहे.

तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आणि गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी खेड, चिपळूण आणि रत्नागिरी येथे एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. पावसामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल कोकण रेल्वे प्रशासनाकडून खेद व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांची वाहतूक रद्द करण्यात आली आहे. तर काहींचे मार्ग वळवण्यात आले आहेत. त्याची माहिती देखील सोशल मीडिया पोस्टमधून देण्यात आली आहे.