सांगली जिल्ह्यात 2.20 लाख हेक्टरवर पेरणी; दमदार पावसाने खरिपाचा टक्का वाढला

सांगली जिह्यात जूनच्या सुरुवातीपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने यंदा खरिपाच्या पेरण्यांचा टक्का वाढला. जिह्यात खरिपाच्या 2 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्रांपैकी 2 लाख 20 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. हे प्रमाण 85.23 टक्के आहे. मका आणि उडीदाची सरासरीपेक्षा जादा पेरणी झाली. जत, आटपाडी तालुक्यात ज्वारी, बाजरीचे मोठे क्षेत्र आहे. तेथे बाजरीची 47 हजार 254 हेक्टरवर पेरणी झाली. मात्र, ज्वारी क्षेत्र शिल्लक आहे. शिराळ्यात भाताची 12 हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, दमदार पावसाने चांगली वाढ आहे. नदीकाठावर सोयाबीन 33 हजार 805 हेक्टरवर आणि भुईमूग 28 हजार 819 हेक्टरवर टोकण पूर्ण झाली आहे.

सांगली जिह्यात खरिपाचे 2 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्र आहे. हवामान विभागाने सुरुवातीपासून पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी सुखावला होता. जून आणि जुलैमध्ये काही अपवाद वगळता जिह्याच्या सर्वच भागात दमदार पाऊस झाला. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून, पेरण्यांना गती आली आहे. जिह्यात आत्तापर्यंत 2 लाख 20 हजार हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे. शिराळा तालुक्यात जूनच्या सुरुवातीस धूळवाफेवर भाताची लागण करण्यात आली होती. शिराळ्यात 14 हजार 275 हेक्टर भाताचे क्षेत्र असून, त्यापैकी 12 हजार हेक्टरवर लागण झाली. पिकांची वाढ चांगली आहे. कृष्णा आणि वारणा नदी काठावर सोयाबीन आणि भुईमुगाची टोकणीला गती आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा आणि मिरज पश्चिम भागात दोन्ही पिके मोठय़ा प्रमाणात घेतली जातात. सोयाबीनचे 43 हजार 94 हेक्टर क्षेत्र असून, 33 हजार 805 हेक्टरवर पेरणी झाली. भुईमुगाचे 33 हजार हेक्टरपैकी 28 हजार 634 हेक्टरवर टोकण झाली आहे.

जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि खानापूर या तालुक्यांत ज्वारी आणि बाजरीचे मोठे क्षेत्र आहे. तेथील शेतकरी पावसावर अवलंबून आहेत, त्यामुळे त्यांचे डोळे पावसाकडे लागले होते. याठिकाणी उशिराच्या पावसानंतर पेरण्यांना सुरुवात झाली. ज्वारीचे 27 हजार हेक्टर क्षेत्र असून, 16 हजार 291 हेक्टरवर पेरणी झाली. बाजरीचे 54 हजार 230 हेक्टर क्षेत्र असून, 47 हजार 254 हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे 40 हजार 753 हेक्टर क्षेत्र असले तरी 41 हजार 411 हेक्टरवर पेरणी झाली असून, त्याचे प्रमाण 101 टक्के आहे. मूग 7 हजार 592 हेक्टरपैकी 3 हजार 898 हेक्टर, उदीड 15 हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यामध्ये वाढ झाली. तब्बल 18 हजार 307, इतर कडधान्ये 3 हजार 771 हेक्टरवर पेरणी झाली.

जूनच्या प्रारंभापासूनच जिह्यातील दुष्काळी भागासह पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, जिह्यात अद्यापही 35 हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना आहे. पावसाने उसंत दिल्याने शेतीच्या कामांना गती आली आहे. उघडीपीमुळे बहुतांशी भागात पेरण्यांची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे.

सांगलीतील पीकनिहाय

पेरण्या (हेक्टरमध्ये)

पीक………….. पेरणी

भात………….. 11,990

सोयाबीन……. 33,805

भूईमूग………. 28,635

ज्वारी………… 16,291

बाजरी………… 47,254

मका………….. 41,411

सूर्यफूल……… 1,035

तूर……………. 10,189

मूग…………… 3,898

उदीड…………. 18,307