शिखर बँक घोटाळय़ात क्लीन चिट मिळणे हाच सर्वात मोठा घोटाळा, संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित 25 हजार कोटींच्या घोटाळय़ात क्लीन चिट मिळणे हाच एक सर्वात मोठा घोटाळा असल्याचा घणाघात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केला. अशा पद्धतीने हजारो कोटींच्या घोटाळय़ाचे आरोप करीत खटले चालवायचे आणि त्यासाठी सरकारचे लाखो रुपये खर्च करायचे आणि तोच आरोपी आपल्या पक्षात आला की सर्व गुन्हे माफ करून त्याच्याबद्दल चांगले बोलायचे. मग हा झालेला खर्च कुणाकडून घ्यायचा, नरेंद्र मोदींकडून का? असा रोखठोक सवालही संजय राऊत यांनी केला.

शिखर बँक घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तपास बंद करण्यासंदर्भात विशेष न्यायालयात अर्ज केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आता याच प्रकरणात राज्यातील सात कारखान्यांनी मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका जाहीर केल्याने अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आज बोलताना संजय राऊत यांनी सरकारच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला.

…तर सरकार कधीही कोसळेल

मोदी जिंकले म्हणून पेढे वाटणाऱया नेत्यांना मी मानसिक तपासणीचे आवाहन करतो, असा टोलाही त्यांनी लगावला. मोदींचे सरकार अल्पमतात आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांना देवाने सुबुद्धी दिली तर त्यांचे सरकार कधीही कोसळेल, असेही राऊत म्हणाले.

मोदी, शहाच संविधानाची हत्या करताहेत

विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याचे काँग्रेसने मान्य केले आहे. त्यांना फार मोठय़ा रकमा आणि जमिनीचे तुकडे दिल्याचेही त्यांनी मान्य केले. ही एक प्रकारची संविधानाची हत्याच असल्याचे ते म्हणाले. अशा पद्धतीने आमदारांना पैसे देऊन मते फोडणे ही संविधानाची हत्या नाही का, असा सवाल करतानाच मोदी, शहाच संविधानाची हत्या करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.