
बनावट सिमकार्ड विक्रीसाठी आलेल्या दोघांना क्राइम ब्रँच युनिट 9 ने बेडय़ा ठोकल्या. भावेश गोठी आणि भरत सुथार अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 441 बनावट सिम कार्ड जप्त केली आहेत.
बनावट सिमकार्डचा वापर, देशविघातक कृत्य आणि फसवणुकीसारख्या गुह्यात केला जातो. असे कृत्य करणाऱयावर पोलीस लक्ष ठेवून असतात. वांद्रे परिसरात एक जण बनावट सिमकार्ड विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट-9 ला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन पाटील, दीपक पवार, सहायक निरीक्षक महेंद्र पाटील, उत्कर्ष वझे, उप निरीक्षक सुजित झने, नरेंद्र पालकर आदीच्या पथकाने तपास सुरू केला. शनिवारी सायंकाळी पोलिसांनी वांद्रेच्या लाल मिट्टी परिसरात फिल्डिंग लावली. त्यानंतर पोलिसांनी भावेश आणि भरतला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने ती सिमकार्ड विक्रीसाठी आणल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी भावेशकडून 331 तर भरतकडून 131 सिमकार्ड जप्त केली. त्या दोघांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याचा तपास युनिट-9 कडे सोपवण्यात आला. त्या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्या दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्या दोघांनी ती सिमकार्ड कोणाकडून आणि कशा प्रकारे मिळवली होती. ती सिमकार्ड ते नेमके कोणाला देणार होते का, त्या दोघांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगार टोळीशी संबंध आहे का, त्याने यापूर्वी बनावट सिमकार्डची विक्री केली होती का, त्यांना बनावट सिमकार्ड मिळवून देण्यात कोणी मदत केली होती का, त्याने बनावट सिमकार्डचा वापर करून कोणता गुन्हा केला आहे का याचा तपास युनिट-9 करत आहे.