मॅटमुळे न्यायपालिकेवरील ताण कमी होतोय; मुख्य न्यायाधीशांनी थोपटली पाठ, 33 वा वर्धापन दिन साजरा

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामुळे (मॅट) न्यायपालिकेवरील ताण कमी होत आहे. येथील कामकाज गतीमान करण्याचा अत्यंत स्त्युत्य उपक्रम सध्या सुरू आहे, अशी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी मॅटची पाठ थोपटली.

मॅटचा 33 वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्य न्यायाधीश उपाध्याय यांनी मॅटमधील अत्याधुनिक बदलांचे कौतुक केले. मॅट न्यायदान प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्याय व्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास कशी गतिमानता येते, हे मॅटने दाखवून दिले आहे, असे मुख्य न्यायाधीश उपाध्याय यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला मॅटच्या अध्यक्षा माजी न्या. मृदुला भाटकर,  मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाधिवक्ता बीरेंद्र सराफ, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ, ‘महारेरा’चे अध्यक्ष न्या. संभाजी शिंदे, अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे,  उपाध्यक्ष माजी न्या. पी आर बोरा, सदस्य देवाशिष चक्रवर्ती, मेधा गाडगीळ, रजिस्टार पी. एस. झाडकर, विशेष कार्य अधिकारी सुरेश जोशी उपस्थित होते.

सेवा देताना पदोन्नती, बदली, नियुक्ती, निवृत्ती अशा प्रकरणांमध्ये मॅट महत्त्वाची भूमिका बजावते. सेवेतील अनेक प्रकरणांमध्ये मॅटने दिलेले निकाल पथदर्शी ठरतात, असे मुख्य न्यायाधीश उपाध्याय म्हणाले.

मोबाईल ऍपची सुविधा

मॅटने ई- मॅट नावाने  मोबाईल ऍप विकसित केले आहे.  न्यायिक प्रकरणांची सद्यस्थिती, आदेश व निर्णय यांची माहिती या ऍपवर मिळते. मॅटचे निकाल व आदेशांचे भाषांतर मराठीमध्ये करण्यासाठी ‘सुवास ऍप’ सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्षा माजी न्या. भाटकर यांनी दिली.