जगभरातून महत्वाच्या बातम्या

टोमॅटो खा जपून; पुरवठा घटणार

अनेक राज्यांमध्ये पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कांदा, बटाटा आणि टोमॅटोची टंचाई निर्माण होते. तसेच सध्या 100 रुपये किलोने मिळणारे टोमॅटोचे दरही आणखी वाढू शकतात. त्यामुळे टोमॅटो जरा जपूनच खावे लागणार आहेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून टोमॅटोचा पुरवठा वाढला तर टोमॅटोचे दर कमी होण्याची आशा आहे. प्रचंड उष्णता आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे टोमॅटोचे उत्पादन घटले आहे.

चीनच्या 5 जीला जर्मनीत बंदी 

चीनच्या 5 जी नेटवर्क देणाऱया दूरसंचार कंपन्यांच्या उपकरणांना जर्मनीत बंदी घालण्यात आली आहे. हुआवो आणि जेडटीई अशी या कंपन्यांची नावे असून चीनवर आर्थिकदृष्टय़ा निर्भर न राहण्याचा निर्णय जर्मन सरकारने घेतला आहे.

 केपी शर्मा ओली तिसऱयांदा नेपाळचे पंतप्रधान

अपेक्षेप्रमाणे केपी शर्मा ओली यांची रविवारी तिस्रयांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. देशाला राजकीय स्थैर्य मिळवून देण्याचे कठीण आव्हान 72 वर्षीय ओली यांच्या आघाडी सरकारला पेलावे लागणार आहे.

 विमानात लॅपटॉपचा स्फोट; सर्व प्रवासी सुरक्षित

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान टेक ऑफ करण्यापूर्वी एका प्रवाशाच्या लॅपटॉपचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. संपूर्ण विमानात जिकडे तिकडे धुरच धूर दिसत होता. या घटनेमुळे प्रवासी विमानाबाहेर पडण्यासाठी धावले. आपत्कालीन स्लाईडद्वारे प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. एका बॅगेत ठेवलेल्या लॅपटॉपला आग लागल्यामुळे धूर पसरला होता.  घटनेबाबत कळताच अग्निशमन दलाचे जवान विमानात पोहोचले आणि आग आटोक्यात आणली.

पोटगी आदेशाला मुस्लिम लॉ बोर्डाचे आव्हान

कलम 125 मुस्लिम विवाहित महिलांसह सर्व विवाहित महिलांना लागू आहे आणि त्यातील तरतुदींनुसार मुस्लिम घटस्फोटित महिलांनाही पोटगी मागण्याचा अधिकार आहे, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड कोर्टात आव्हान देणार  आहे.

चीन, रशिया यांचा संयुक्त नौदल सराव

युक्रेन युद्धासंदर्भात चीन आणखी कलागती लावत असल्याचे नाटोच्या मित्र राष्ट्रांनी म्हटल्यानंतर चीन आणि रशियाच्या नौदलाने रविवारी दक्षिण चीनमधील एका लष्करी बंदरावर संयुक्त सराव सुरू केला आहे. उभय देशांच्या सैन्याने अलीकडेच पश्चिम आणि उत्तर प्रशांत महासागरात गस्त घातली.