
ब्लड कॅन्सरशी झगडत असलेल्या माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांच्या उपचारार्थ बीसीसीआयला महान गोलंदाज कपिल देव यांनी विनंती करताच बीसीसीआय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. लंडनमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गायकवाड यांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत बीसीसीआयने दिली आहे.
शनिवारीच कपिल यांनी अंशुमन गायकवाड यांच्या आजारपणाबाबत भाष्य केले होते आणि त्यांच्या पाठीशी बीसीसीआयने उभे राहावे तसेच त्यांनी समकालीन क्रिकेटपटूंकडेही मदत मागितली होती. त्यांनी आपल्या विनंतीत बीसीसीआयने आपल्या ज्येष्ठ क्रिकेटपटूंकडेही पाहायला हवे. त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांच्यासाठी एक समितीही नेमावी, असा सल्ला दिला होता. कपिल यांनी आपले निवृत्तीवेतनही गायकवाड यांच्या कुटुंबाला देत असल्याचे म्हटले होते. त्यांची ही विनंती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी तत्काळ मान्य करत गायकवाड यांना एक कोटी देण्याचे निर्देश बीसीसीआयच्या वित्त विभागाला दिले. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून सर्व माहितीही जाणून घेतली. बीसीसीआय आर्थिक मदतीसह त्यांच्या उपचारांचाही आढावा घेणार असल्याचे कळवले आहे.
गायकवाड यांनी आपल्या 22 वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीत 40 कसोटींसह 205 प्रथम श्रेणी सामनेही खेळले आहेत. ते काही काळ हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षकही होते. त्यांच्या आजारपणाची माहिती मिळताच कपिल देवसह मोहिंदर अमरनाथ, सुनील गावसकर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, मदनलाल आणि रवी शास्त्रीसारख्या दिग्गज खेळाडूंनी मदत निधी उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचदरम्यान बीसीसीआयच्या आर्थिक मदतीमुळे दिग्गज क्रिकेटपटूंना धीर मिळाला आहे.