पालगड पवारवाडी पुलावरून पाणी आले; मुंबई-पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प

दापोली मंडणगड या वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्वाच्या मार्गावर साने गुरूजींच्या पालगड या गावातील पवारवाडी येथील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने मंडणगड, पूणे , मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने थांबवली आहे.

दापोली मंडणगड, मुंबई हा मार्ग दापोली तालूक्यासाठी अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावर दापोलीतील लोकांना पुणे, मुंबई, मंडणगड, महाड तसेच तालूक्यातील काही गावांकडे जाण्यासाठीचा हा महत्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावरील पालगड येथील पवारवाडी येथील एका पुलावरून पूराचे पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतुक सुरक्षिततेच्या कारणाने प्रशासनाने पुराचे पाणी ओसरेपर्यं बंद ठेवली आहे.

दापोली मंडणगड या मार्गावर दर तासाने एस.टी.बसेस धावत असतात. तसेच खाजगी वाहनांचीही वर्दळ असते. या मार्गावरील पालगड पवारवाडी येथील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने वाहतुक ठप्प आहे. रविवार असल्याने विदयार्थी शाळा,महाविद्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे त्यांची अडचण झाली नाही. मात्र, काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांना पुराचे पाणी ओसरेपर्यंत वापट पाहावी लागली.