गुजरातमध्ये अवैध कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजूरांचा गुदमरुन मृत्यू

गुजरातच्या सुरेंद्र नगरमध्ये अवैध कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजूरांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. पोलिसांनी रविवारी याबाबत माहीती दिली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी चार लोकांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा तपास सुरु आहे.

पोलिसांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण डाभी (35), खोदाभाई मकवाना(32) आणि विराम केरलिया (35) अशी ओळख पटलेली आहे. हे सर्व मजूर शनिवारी जिल्ह्यातील थानगड तालुक्यातील भेट गावाजवळील खाणीत खोदकाम करत होते, त्याचवेळी त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. ते म्हणाले की, मृत कामगार काम करत असताना त्यावेळी त्यांच्याकडे कोणतेही हेल्मेट, मास्क किंवा इतर सुरक्षा उपकरणे नव्हती. एफआयआरनुसार, आरोपींनी विहीर खोदण्यात गुंतलेल्या मृतांना हेल्मेट किंवा इतर सुरक्षा उपकरणे दिली नाहीत.

यामध्ये म्हंटले आहे की, विहीरीतून येणाऱ्या गॅसमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जशाभाई केरलिया, जनक अनियारिया, खिमजीभाई सारडिया आणि कल्पेश परमार यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते म्हणाले की, मृत मजूरांचे मृतदेह शविविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.