
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान झाले. यात क्रॉस व्होटिंग झाल्याचीही चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत क्रॉस वोटिंगबाबत मोठा दावा केला आहे. पक्षाच्या गद्दारांची ओळख पटली असून लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. पुढे ते म्हणाले याच गद्दारांनी दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते चंद्रकांत हेडोरे यांचा पराभव केला होता, असेही त्यांनी सांगितले.
नाना पटोले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, यावेळी सापळा रचून त्या गद्दारांची ओळख पटवली आहे. त्या गद्दारांनी त्याची शिक्षा दिली जाणार असून भविष्यात अशाप्रकारची गद्दारी करण्याचे धाडस करणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतफुटीचा अहवाल लवकरच दिल्लीला पक्षश्रेष्ठीकडे पाठवण्यात आला असून पक्ष विरोधी कारवाई करण्याची शिफारस प्रदेश काँग्रेसने दिल्लीला पाठवलेल्या अहवालात केल्याचे त्यांनी सांगितले. मागील खेपेस चंद्रकांत हंडोरे ज्यावेळी निवडणुकीला उभे होते, त्यावेळीही हा प्रकार झाला होता. मात्र त्यावेळी त्या लोकांची ओळख पटली नव्हती. म्हणूनच आम्ही या लोकांना जाळ्यात अडकविण्यासाठी काही निर्णय घेतले. त्यात हे बदमाश लोक सापडले आहेत. यासंदर्भात वरिष्ठांना कळविलेले आहे. लवकरच पक्षविरोधी काम करणाऱ्या गद्दार आमदारांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल, असेही पटोले यांनी सांगितले.
तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केल्याचा आरोप केला आहे.