
छत्रपती संभाजीनगरातील 50 हून अधिक तरुण दहशतवादी संघटना ‘इसिस’च्या संपका&त आल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपपत्रातून समोर आली आहे. इसिसच्या कारवायांचे धडे देण्यासाठी तरुणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला गेला होता. एनआयएने मोहम्मद जोहेब खान व मोहम्मद शोएब खानविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात ‘इसिस मॉडय़ूल’संबंधी माहिती उघड केली आहे.
एनआयएने मोहम्मद जोहेब खानला फेब्रुवारीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली होती. अधिक चौकशीदरम्यान त्याचा भाऊ, फरार आरोपी मोहम्मद शोएब खान लिबियात असल्याचे उघडकीस आले होते. शोएबचे देशातील मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांच्या यादीत नाव आहे. त्याने लिबियात इसिसमध्ये सक्रिय होण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी देश सोडला, मात्र तेथून भावाच्या मदतीने इसिसचे हिंदुस्थानातील नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न ठेवला, असा दावा एनआयएने केला आहे.
शोएब आणि जोहेब खान या दोघा भावांनी देशभरातील महत्त्वाच्या व संवेदनशील आस्थापनांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने संभाजीनगर जिह्यातील तरुणांची माथी भडकवण्यास सुरुवात केली होती. या तरुणांना इसिसमध्ये सहभागी करून घेत दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा हेतू होता. हे दोघे इसिसच्या संभाजीनगर मॉडय़ूलचे प्रमुख होते.
हिंदुस्थानविरोधी अजेंडय़ाला प्रोत्साहन
जोहेब हादेखील कट्टरपंथी होता व इसिसच्या भरती प्रक्रियेत सामील झाला होता. त्याने हिंदुस्थानातील अनेक इसिस स्लीपर सेलशी संपर्क ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे. अनेक ठिकाणी झडती घेतल्यानंतर एनआयएने जोहेब व शोएब या दोघांविरुद्ध इसिसच्या हिंदुस्थानविरोधी अजेंडय़ाला प्रोत्साहन देण्यासाठी कट रचल्याबद्दल आरोपपत्र दाखल केले आहे.