
पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक हजेरी लावणार आहेत. येथील घाटात अपघात होण्याची भीती व्यक्त करणाऱया जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. चंद्रभागा नदीकाठावरील घाटात कोणताही अपघात घडणार नाही यासाठी काय उपाययोजना करणार, असा सवाल न्यायालयाने सरकारला विचारला आणि याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागा नदीकाठावरील घाट सुशोभीकरणाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. चार वर्षांपूर्वी, ऑक्टोबर 2020 मध्ये मुसळधार पावसात पुंभार घाटावरील भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला होता. घाट सुशोभीकरणाच्या कामात वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे होते. त्या दुर्घटनेतील दोषींविरोधात कारवाई करावी तसेच ठेकेदारांच्या पंपनीचा काळय़ा यादीत समावेश करावा, अशी मागणी करत अॅड. अजिंक्य संगीतराव यांनी अॅड. राकेश भाटकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार
सुनावणीवेळी सरकारतर्फे अॅड. प्रियभूषण काकडे यांनी बाजू मांडली. चार वर्षांपूर्वी दुर्घटना घडली होती त्याठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे, असे अॅड. काकडे यांनी सांगितले.