
महाराष्ट्रात लाखो बेरोजगारांना रोजगार देऊ शकणारे प्रकल्प मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातसह अन्य राज्यांत गेले. केंद्र सरकारनेही त्यावर काहीच केले नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा नवे आश्वासन दिले. विविध प्रकल्पांतून महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्राला आर्थिक पॉवर हाऊस बनवायचे आपले लक्ष्य असून मुंबईला जगाचे थिंक टँक पॅपिटल बनवणार असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र आणि मुंबईत तीस हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि परिसरातील कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होऊन महाराष्ट्रात मोठय़ा संख्येने रोजगार निर्मिती होईल, असे मोदी म्हणाले.