महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजितदादांवर ‘त्या’ दोघांचा दबाव

अजित पवार यांना महायुती सरकारमध्ये घेतल्याचा भाजपला कोणताही लाभ झालेला नाही. याउलट जनमानसात भाजपची प्रतिमा डागाळली आहे. संघाच्या मुखपत्रानेही अजित पवारांना सरकारमध्ये घेण्याच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली होती. दरम्यान, अजितदादांना विधानसभा निवडणुकीआधी महायुतीतून बाहेर काढण्यासाठी त्या दोघांचा दबाव वाढत आहे. त्यात आज अचानक अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

विधान परिषदेच्या शुक्रवारच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी विजयी उमेदवारांसोबत एकत्रित फोटो विधान भवनात घेतले होते, मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या फोटोफ्रेमच्या बाहेर होते. अजितदादांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. त्यामुळे महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे शुक्रवारीच स्पष्ट झाले. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी फोटोफ्रेमबाहेर असलेल्या अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते.

अजितदादांना महायुतीत आणण्याचा निर्णय अमित शहा यांचा होता. त्यांना सोबत विधानसभा निवडणूक एकत्रित लढविल्या तर महायुतीला फटका बसू शकतो, अशी भीती भाजप व मिंधे गटामध्ये आहे. त्यामुळे त्यांना महायुतीबाहेर काढा, अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मतविभाजनासाठी भाजपची खेळी

लोकसभा निवडणुकीत महायुतीतले तिन्ही पक्ष एकत्र लढले. यामध्ये अजित पवार गटाचा म्हणावा तसा फायदा झालेला नाही. यामुळे अजितदादांना वेगळे लढायला भाग पाडून मतविभाजनाची खेळी भाजपकडून खेळली जाण्याची शक्यता आहे.

 कर्जमाफी, विधान परिषद सभापतीपद

शेतकरी कर्जमाफी व विधान परिषदेचे सभापतीपद पक्षाला द्यावे, यासाठी ते अमित शहा यांना भेटले असल्याचा दावा राष्ट्रवादीतील सूत्रांनी केला, मात्र या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे.