मोनेगिरी : निष्क्रिय वायू श्रीरंग पांडुरंग रंगनाथकर

>>संजय मोने

नावातच तीन रंग असणारा आमचा श्रीरंग मनाने आणि वृत्तीने अगदी पाण्यासारखा पारदर्शी. केवळ नितळ नव्हे तर निष्क्रिय स्वभावगुण लाभलेल्या श्रीरंगाच्या आयुष्यात एका अनपेक्षित वळणावर राधेचा प्रवेश झाला आणि श्रीरंगाचं आयुष्य बहुरंगी झालं. राधेच्या पाशात त्याचं बहुरंगी होणं हा नियतीचा खरा खेळ होता.

ज्याच्या नावात तीन तीन रंग आहेत तो किती रंगेल असला पाहिजे? ज्याच्या आजोबांना लग्नाच्या सख्ख्या दोन बायका.ज्या आयुष्यभर गुण्यागोविंदाने आपल्या एका पतीबरोबर नांदल्या. वडिलांना सुदैवाने एकच बायको होती. पण त्याची कसर त्यांनी दोनही हाताच्या बोटावर नाही, पण एक हाताच्या बोटावर नक्की मोजता येतील इतक्या मैत्रिणी कायम बाळगल्या. त्यांचा वंशज किती रंगेल असला पाहिजे? ज्याच्या मोठय़ा भावाने आपल्याहून आठ वर्षांनी मोठी असलेल्या मुलीबरोबर लग्न केलं आणि लग्नानंतर पाचच महिन्यात एक मुलगी झाली, ज्याच्या बहिणीने पळून जाऊन एका परधर्मीय मुलाबरोबर लग्न केलं आणि त्याला आपला धर्म स्वीकारायला लावला, तिचा भाऊ किती रंगीत-संगीत असला पाहिजे? पण श्रीरंग हा घरातल्या सगळ्यांपेक्षा आगळा वेगळा होता.त्याची आईसुद्धा रविवारी घरातल्या सगळ्यांबरोबर उत्तम सामिष जेवण झाल्यावर, त्याआधी अर्थात थोडं रंगीत पाणी सोडय़ाबरोबर प्राशन करून, छान किवाम, शेकेली सुपारी, भक्कम चुना घातलेलं पान मस्त मजा घेऊन चघळायची. तिच्या पोटचा दिवा किती ढंगबाज असला पाहिजे.

सणासुदीला त्यांचे इतर नातेवाईक जमायचे तेव्हा तर जेवण, त्याआधी रंगीत पाणी, काहीजण धुरकांडय़ा वगैरे सगळं साग्रसंगीत साजरं करायचे. बासुंदीच्या किंवा श्रीखंड, आमरस यांच्या वाटय़ाच्या वाटय़ा पैज लावून फस्त करायचे. तेव्हा आमचा श्रीरंग तितपत तरी म्हणजे अगदी थोडासा रंग-ढंगवाला पाहिजे की नाही? पण तो बिलकुल त्यातला नव्हता. अगदी लहान असतानापासून मी त्याला ओळखत होतो. शाळेतून आल्यानंतर अंगातले कपडे उपसल्यासारखे फेकून देऊन आम्ही खेळायला जायचो. साधारण तीन मिनिटात वेषांतर करून सगळे जण दंगामस्ती करायला लागायचो. हा मात्र तब्बल पंधरा मिनिटांनी यायचा. अत्यंत टापटीप. शर्ट अर्ध्या विजारीत खोचून, केसबिस विंचरून तयार होऊन तो आम्ही खेळत असायचो तिथे एका कोपऱयात उभा राहायचा. त्याची भावंडं पाचोळ्यासारखी भिरभिरत खेळायची. खूप आग्रह केला तर तो नावापुरता खेळायचा. खेळ संपल्यावर आमचा सगळ्यांचा ‘अवतार’ झालेला असायचा, पण तो मात्र येताना असायचा तसाच असायचा. कधीकाळी घरच्यांनी चार पैसे खाऊसाठी दिले तर आम्ही त्या दिवसाआधी काहीच खायला न मिळाल्यासारखे बकाबका खायचो, पण हा दूध प्यायचा. शिकस्त म्हणजे पियुष किंवा लस्सी!

शाळेत होता तेव्हा घरचे कपडे घेऊन द्यायचे. त्यामुळे जरा तरी रंग त्याच्या कपडय़ांवर दिसायचे. पण कॉलेजला गेल्यावर जेव्हा तो स्वतच्या आवडीने खरेदी करायला लागला तेव्हा फक्त निळा रंग त्याच्या शरीराला चिकटला. सगळं निळ्या रंगाचं. अगदी आतले कपडेसुद्धा. नाही म्हणायला त्याला व्यायामाची चटक लागली. त्यानंतर व्यायाम, अभ्यास आणि वाचन या त्रिसूत्रीवर त्याचं आयुष्य अवलंबून होतं. घरातल्या इतरांनी त्याला खूप सांगितलं. रंगीत पाण्याची (सोडा मिश्रित) सवय लावायचा आटोकाट प्रयत्न केला. पण तो त्रिसूत्रीपासून ढळला नाही. सगळं कसं एककल्ली असायचं. घरी जेवायचा तेव्हा त्याचं ताट, वाटी, पाण्याचं भांडं ठरलेलं. जेवणही ते आणि तेच. तो दररोज बटाटा, कोबी आणि कुठलीही उसळ, ठरलेल्या पोळ्या आणि ताक एवढंच खायचा. तेही एकदा वाढून घ्यायचं. घरी मांसाहारी जेवण असेल तर तो बाहेर जाऊन जेवायचा. आमरस वगैरे घरचे रोज खायचे, तर हा आठवडय़ातून एकदाच खायचा. बाकी रोज व्यायाम आणि अभ्यास आणि वाचन. घरी सगळे मौजमजा करणारे होते. त्यामुळे मेजवान्या, गाणी, गप्पा आणि धमाल चालायची. पण हा त्या कशातच नसायचा.

आता अशा बेरंगी माणसाची कथा काय सांगायची आणि का वाचायची असं तुम्हा वाचकांना वाटल्याशिवाय राहाणार नाही. हो ना? पण त्याच्या आयुष्यात एक घटना अशी घडली की, त्याचं आयुष्य बदलून गेलं. अन्यथा हा लेख लिहायची गरजच पडली नसती. झालं असं की तो एका जाहिरात कंपनीत नोकरीला लागला. तिथे चोहीकडे रंगच रंग असायचे. हाच एकटा निळा असायचा. जाहिरातीत कुठले रंग असावेत हे तो ठरवायचा. कमाल आहे की नाही? सगळ्यांना अगदी त्या कंपनीच्या मालकालासुद्धा आश्चर्य वाटायचं. एक दिवस त्या कंपनीत एका कंपनीची मालक असलेली एक मुलगी आली. राधा साटम होतं तिचं नाव. खानदानी मराठा सौंदर्य. तिखट, पण झळाळी असलेलं. लाखात उठून काय बसूनसुद्धा दिसेल अशी. याने थंडपणे तिची विचारपूस केली. ऑफिसात सगळे तिच्याकडे डोळे फाडफाडून बघत होते. याच्यावर तिच्या सौंदर्याचा ढिम्म परिणाम झाला नाही. शांतपणे त्याने तिचं काम करून दिलं आणि आपला डबा उघडून तो जेवू लागला. तिला हा असा थंड अनुभव नवीन होता. जरा चिडलीच ती. कंपनीचा मालक स्वत तिला सोडायला दारापर्यंत आला.
‘कोण आहे हा?’
‘माझा सगळ्यांत चांगला…’ मालक.
‘असेल! पण he is so cold and unresponsive! And that too me!’ राधाला हा अनुभव नवीन होता.

‘आमचे सगळे प्रॉडक्ट तोच करणार. आमची दोघांची एक मिटिंग ठरवा आणि तिसरा कोणी नको. तुम्हीही नाही.’ असं म्हणून ती तिच्या भल्यामोठय़ा गाडीतून निघून गेली. मग तीन दिवसात एक भेट ठरली. ती खूप वेळ चालली, त्यात काय बोलणं झालं ते इतिहासाला अज्ञात आहे. त्याने नोकरी सोडली आणि राधाच्या कंपनीत तो नोकरीला रुजू झाला. शेंदरी रंगाची जीन्स आणि जांभळा शर्ट घालून तो ऑफिसात आला. आल्याबरोबर राधा आणि त्याने, म्हणजे राधानेच, एकमेकांना कडकडून मिठी मारली. पुढे राधाने त्याच्या घरच्यांना ‘त्याच्यासाठी’ मागणी घातली. त्याच्या घरच्यांनी एक जबरदस्त मेजवानी दिली. त्यात त्याच्या वडिलांनी एक रंगीत पाण्याने भरलेला फेसाळ पेला राधाच्या हातात दिला. त्याच्या घरचे, पेला रिकामा होतोय की नाही याची वाट बघत होते. राधाच्या सासूने, त्याच्या आईने… ‘राधा! तू नसतीस तर हा क्षण आमच्या आयुष्यात आलाच नसता गं.’ असं म्हणून तिच्या ओठात रंगीत प्याल्यातला द्रव ओतला. राधा तो गटागट प्याली आणि सगळ्यांनी जल्लोष केला.

आता तो पूर्णपणे बायकोच्या मुठीत किंवा मिठीत आहे. त्याच्या घरचे सगळे राधाचे आयुष्यभर आभार मानणार आहेत. आता तो अनेकरंगी कपडे घालतो. राधाबरोबर मासे, मटण आणि चिकन भरपेट खातो. राधा सध्या घरात अत्यंत मानाच्या जागी आहे. सासरे आणि सासू व बाकीचे कुटुंबीय तिच्या सल्ल्यानुसार घर चालवून घेतात. तिरंगी श्रीरंग आता बहुरंगी झाला आहे. थोडक्यात निष्क्रियवायू अनेकरंगी झाला आहे.

जय राधा!
[email protected]