वेबसीरिज – रहस्याचा मागोवा

>> तरंग वैद्य

एका मृत्यूवर न थांबणारी गोष्ट आणि या गूढ हत्येचा तपासात खुन्याचा शोध घेताना अनेकांवर फिरणारी संशयाची सुई. या रहस्यकथेला जोडलेले उपकथानक अशी लिखाणाची, पटकथेची गंमत असणारी ही वेबसीरिज… कँडी

उत्तराखंड येथील जंगल आणि पर्वतांमध्ये वसलेले रुद्रकुंड नावाचे गाव, जिथे ‘रुद्र व्हाली’ नावाची एक शाळा आहे, ज्यांचे स्वतचे वसतिगृह आहे. कारण इथे स्थानिक विद्यार्थ्यांव्यतिरिक्त शहरातील मुलेही शिकायला येतात. शाळा श्रीमंत आहे, नावाजलेली आहे, कडक अनुशासन आहे आणि अनुशासन मोडणारे काही विद्यार्थीही आहेत. सर्व काही सुरळीत सुरू असताना एके दिवशी एक विद्यार्थी बेपत्ता होतो आणि पुढे तो मृतावस्थेत सापडतो. गावात खळबळ माजते. शाळा आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी या बातमीचा प्रचार होऊ नये यासाठी प्रयत्न करते आणि पोलीस आपला तपास सुरू करतात. या तपासात काय काय उलगडते ही थोडक्यात कथा आहे ‘कँडी’ या नावाने 8 सप्टेंबर 2021 रोजी वूट या ‘ओव्हर द टॉप’ म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या वेब सीरिजची. ही वेब सीरिज आता ’जिओ सिनेमा’वरही उपलब्ध आहे.

तुम्हाला प्रश्न पडेल की, शाळेची पार्श्वभूमी, गूढ हत्येचा तपास आणि मालिकेचे नाव ‘कँडी’… असं का? कँडी म्हणजे गोळी किंवा टॉफी, जी मुलांच्या आवडीची आणि या रुद्रकुंडमध्ये कँडी बनविण्याचा कारखाना आहे. त्यामुळे या मालिकेचे नाव ‘कँडी’.

या वेब सीरिजला रहस्यकथा म्हणून सादर केले आहे आणि त्याला आवश्यक ती सामग्री अशा पद्धतीने पेरली आहे की, प्रेक्षक खुर्ची सोडत नाही. खुन्याचा शोध घेताना संशय अनेकांवर जातो. जी व्यक्ती आता आपल्याला बरी वाटत असते, काही मिनिटांनी संशयित वाटू लागते. ही लिखाणाची आणि पटकथेची गंमत आहे. गोष्ट एका मृत्यूवर थांबत नाही आणि मृत्यू होत राहतात. गावकऱयांची पोलिसांना काहीच मदत होत नाही. कारण त्यांचे ठाम मत असते की, जंगलातील सैतान ‘मसान’ हजारो वर्षांनी जागा झाला आहे आणि हे त्याचेच काम आहे. पोलीस व यंत्रणा अर्थातच हे मानत नाही आणि ते गूढ उलगडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. मृत्यूच्या तपासाला एक वेगळेच वळण मिळते, जेव्हा तपासादरम्यान समजते की, आमदाराच्या कँडी कारखान्यातील गोळ्यांमध्ये ड्रग्स आहेत, जी संशय न घेता शाळेत, विद्यार्थ्यांना पुरवली जातात. आता आमदार म्हटला की, तो बलशाली असणारच आणि पैसेवालाही. त्यामुळे तो पोलीस कार्यात अडचणी आणू लागतो, गावकऱयांना भडकवतो, ‘मसान’वर सर्व टाकू बघतो. गोष्ट गुंतत जाते आणि आपणही.

मूळ कथेसोबत उपकथाही आहेत. शाळेतील शिक्षक जो एकटाच पोलिसांना सहकार्य करीत असतो, त्याचा भूतकाळ आणि त्याच्या मुलीच्या आत्महत्येची कथा, पोलीस तपास प्रमुख असलेल्या डीएसपी रत्नाचे खासगी आयुष्य, पण या उपकथा मूळ कथेला अडथळा निर्माण करीत नाहीत हे विशेष.

नयनरम्य पर्वतराजी, घनदाट जंगल बघायला छान वाटते, तर गूढ कथेला पोषक असे वातावरणही तयार करते. जंगलातील पाठलागाची दृश्ये परिणामकारक आहेत, त्यात पुरेपूर रोमांच आहे आणि एक अदृश्य भीतीही आहे… ‘मसान’ खरेच आहे का याची.

शेवटच्या भागात अर्थातच सर्व गोष्टींचा खुलासा होतो, पण हा खुलासा वाचण्यापेक्षा बघायला आपल्याला नक्कीच आवडेल. 2021 मध्ये ’सीजन 2’ची प्रथा नसल्यामुळे आठव्या आणि शेवटच्या भागात ही ’मर्डर मिस्टरी’ कुठलेही धागेदोरे न सोडता संपते.

अभिनयाच्या बाबतीत बोलायचे तर रोनित रॉय शिक्षक जयंत पारेखच्या भूमिकेत आहे. भूमिका अर्थातच गंभीर आहे आणि रोनितने आपल्या संयत अभिनयाने ती जिवंत केली आहे. काही दृश्यांमध्ये त्याचे डोळे सगळे बोलून जातात, इतका ताकदीचा त्याचा अभिनय आहे. डीएसपी रत्ना संखवारच्या भूमिकेत रिचा चा आहे, जी या कथेत तपास प्रमुखाच्या भूमिकेत आहे. तिचा अभिनय तर उत्तम आहेच, पण पोलिसांची देहबोलीही तिने छान सांभाळली आहे. आमदार झालेले मनू रिषी चाही भूमिकेला न्याय देतात.

35 ते 40 मिनिटांचे आठ भाग असलेली ही मालिका खिळवून ठेवणाऱया पटकथेसाठी आणि रोनित रॉय व रिचा चाच्या अभिनयासाठी नक्कीच बघा.

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)