राज्यातील महायुती सरकार हे वास्तववादी भान हरवलेलं सरकार आहे. महाराष्ट्रावरील कर्ज दुप्पटीने वाढत आहे असा अहवाल देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांने (कॅग) दिला. कॅगच्या या अहवालावर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे तिजोरीवर भार वाढत असल्याचे निरीक्षण सुद्धा नोंदवलं आहे. 2022-23 या वर्षाच्या महाराष्ट्र राज्य वित्त लेखापरीक्षण अहवालाने राज्य सरकारला वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याची शिफारस केली आहे. मुळात राज्यातील महायुतीचे हे ट्रिपल इंजिन सरकार वास्तववादी भान हरवलेलं सरकार आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
ते म्हणाले की, राज्य सरकारकडून राज्यातील विविध संस्थांना 50 हजार कोटीचा निधी दिला आहे. 50 हजार कोटी कुठे आणि कसे दिले. हे जर कॅगला कळत नसेल तर मग सर्वसामान्य मराठी माणसाला यामध्ये काय कळणार आहे. त्याच्या तिजोरीतील 50 हजार कोटी मंडळाने आणलेले नव्हते ते महाराष्ट्रातील गोरगरीब, कष्टकरी माणसाच्या खिशातून गेलेले आहे. कॅगने या संदर्भातील राज्य सरकारवर केलेले ताशेरे हे गंभीर आहे महाराष्ट्रात 64 वर्षात आज पर्यंत असे ताशेरे कॅगने कधीही ओढलेले नाही आहे. कॅगने महायुती सरकारवर आज जसे गंभीर ताशेरे ओढले आहे तसे आजपर्यंत कधी कॅगने ओढलेले नाही आहे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.