क्रिकेट आणि अंधश्रद्धा हातात हात घालून चालतात असे बोलले जाते. याला कारणही तसेच आहे. अनेक बडे खेळाडू मैदानात उतरताना काही ना काही वेगळे करत असतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आधी डाव्या पायाचा बॅड घालायचा, श्रीलंकेचा लसीथ मलिंगा रन-अपला सुरुवात करण्याआधी चेंडूचे चुंबन घ्यायचा तर दक्षिण आफ्रिकेचा मखाया एनटिनी चक्क आपल्या किटमध्ये शेण ठेवायचा. अशा अनेक कथा आपण याआधी वाचल्या असतील. यासह क्रिकेटमध्ये उधारीची बॅटमुळे आपल्याला सूर गवसल्याचे अनेक फलंदाजांनी सांगितले आहे. या यादीत नुकताच हिंदुस्थानकडून पदार्पण केलेल्या अभिषेक शर्मा याच्याही नावाचा समावेश झाला आहे.
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना अभिषेक शर्माने खोऱ्याने धावा काढल्या. याचा त्याला फायदा झाला आणि त्याची टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय टी-20 संघात एन्ट्री झाली. झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या संघात त्याला स्थान मिळाले. मात्र पदार्पणाच्या लढतीत अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. परंतु पुढच्याच लढतीत अभिषेकने 46 चेंडूत 100 धावा कुटल्या. यात त्याच्या 7 चौकारांचा आणि 8 टोलेजंग षटकारांचा समावेश होता. अभिषेकच्या खेळीमुळे टीम इंडियाने विजय मिळवला आणि मालिकेत बरोबरी साधली.
अभिषेक शर्मा याने ज्या बॅटने शतक ठोकले ती उधारीची होती. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याची बॅट उधार घेऊन अभिषेक मैदानात उतरला होता. अभिषेकने स्वत:च याचा खुलासा केला आहे. उधारीचे हे चेटूक अभिषेकसाठी चांगलेच लाभदायक ठरले. अर्थात क्रिकेटमध्ये उधारीच्या बॅटवर खोऱ्याने धावा जमवण्याची ही पहिच वेळ नाही.
आफ्रिदीचे ऐतिहासिक शतक
4 ऑक्टोबर 1996 रोजी पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी याने श्रीलंकेविरुद्ध वादळी फलंदाजी केली होती. या लढतीत आफ्रिदीने 37 चेंडूत शतक ठोकत सनथ जयसूर्या याचा सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम मोडला होता. आफ्रिदीने हे विक्रमी शतक ठोकले होते सचिन तेंडुलकरच्या बॅटने. सचिनने ती बॅट युनूस खानला भेट दिलेली आणि युनूसने ती आफ्रिदीला दिली. 2021मध्ये एका युट्यूब चॅनलशी बोलताना आफ्रिदीने हा खुलासा केला होता.
रिंकूचे 5 षटकार
कोलकाता नाईय रायडर्सचा संघ 9 एप्रिल 2024 रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध झालेला सामना कधी विसरणार नाही. या लढतीत अखेरच्या षटकात कोलकाताला 29 धावांची गरज होती. मैदानात नवखा रिंकू सिंह होता. सामना हातातून गेला असे वाटत असतानाच रिंकूने चमत्कार केला आणि यश दयालला सलग 5 षटकार खेचत संघाला विजयी केले. रिंकूने ज्या बॅटने 5 षटकार ठोकले ती बॅट तत्कालिन कर्णधार नितीश राणा याची होती.
तिलक वर्माची स्टोरी
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज संघातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 3 ऑगस्टला पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला गेला होता. टीम इंडियाचा हा 200 वा टी-20 सामना होता. या लढतीत तिलक वर्मा आणि मुकेश कुमार यांना पदार्पणाची संधी मिळाली. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून आलेल्या तिलक वर्माकडे सुरुवातीला बॅट घेण्यासाठीही पैसे नव्हते. त्याने बॅट उधार घेतली आणि धावांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. देशांतर्गत क्रिकेट, आयपीएल असा प्रवास करत तो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला.