
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. नारायण राणेंनी मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावून मिळवलेला विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्या, अशी विनंती याचिकेतून केली आहे.
विनायक राऊत यांनी अॅड. असीम सरोदे, अॅड. विनयकुमार खातू, अॅड. श्रीया आवळे, अॅड. किशोर वारक यांच्यामार्फत उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. याचिकेत नारायण राणे यांच्यासह केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांतील निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रतिवादी केले आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये 7 मे रोजी झालेली निवडणूक तसेच 4 जूनचा निकाल अवैध घोषित करण्यात यावा, याचिका प्रलंबित असेपर्यंत नारायण राणे यांना खासदार म्हणून काम करण्यास मनाई करा, निवडणूक प्रचारात मतदारांना धमकी तसेच पैसे वाटप करण्याच्या व्हिडीओच्या आधारे सर्व गैरप्रकारांच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे तसेच नारायण राणेंची निवड अवैध ठरवून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश द्या, आदी मागण्या याचिकेतून केल्या आहेत.
निवडणूक प्रचारातील भ्रष्ट आणि गंभीर प्रकार
5 मे रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणूक प्रचाराची वेळ संपूनही भाजप कार्यकर्त्यांनी 6 मे रोजी खुलेआम आचारसंहिता धाब्यावर बसवली.
भाजपच्या निवडणूक प्रचाराचा एक व्हिडीओ पुढे आला. त्यात जाधव नावाचा भाजप कार्यकर्ता बिनधास्तपणे मतदारांना पैसे वाटताना तसेच नारायण राणे यांनाच मत देण्यासाठी दबाव आणताना दिसत आहे. या वेळी ईव्हीएमची प्रतिकृती मतदारांना दाखवून ‘कमळा’चेच बटण दाबण्यास भाग पाडले गेले.
आचारसंहितेच्या काळात नारायण राणे यांचा आमदारपुत्र नितेश राणे यांनी भडकावू धार्मिक विधाने आणि जाहीर धमकी देऊन वातावरण कलुषित केले.
नितेश राणे यांनी भाजपच्या सिंधुदुर्ग संवाद मेळाव्यात सरपंचांना धमकी दिली. ज्या भागात आम्हाला लीड मिळणार नाही, त्या भागात निधी मिळाला नाही तर आमच्याकडे तक्रार करू नका. 4 जूनला सर्व सरपंचांचा हिशोब घेणार, असे नितेश राणे यांनी सरपंचांना धमकावले होते.
निवडणूक अधिकारी तक्रारीनंतरही ढिम्म
नारायण राणे, त्यांचे चिरंजीव नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र कारवाई करण्याची तसदी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली नाही. आचारसंहिता भंगाच्या प्रकारांकडे जाणूनबुजून डोळेझाक केली आणि निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वाला हरताळ फासला, असा आरोप याचिकेत केला आहे.