आमच्या हक्काविषयी बोललो तर आम्ही जातीयवादी कसे? मनोज जरांगे यांचा संतप्त सवाल

मराठा समाजावर सध्या जातीयवादी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आमच्या हक्काविषयी बोललो तर आम्ही जातीयवादी कसे? असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठा-ओबीसी असा कलह निर्माण करून राज्यात दंगली घडवण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला. जालना येथे मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीसाठी जिल्हाभरातून आलेल्या लाखो मराठाबांधवांसमोर बोलताना मनोज जरांगे यांनी ओबीसी नेते करत असलेल्या आरोपाचा जोरदार समाचार घेतला. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहोत. आम्ही कुणाच्याही हक्काचे मागत नाही. हक्कासाठी, न्यायासाठी लढतो आहोत म्हणून आम्ही जातीयवादी कसे? असा सवाल यावेळी त्यांनी केला.

राणे समितीने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले, त्यानंतर हेच आरक्षण 13 टक्के करण्यात आले. फडणवीस यांनी हे आरक्षण 10 टक्क्यांवर आणले. लोकसंख्या कमी होते की वाढते? हे साधे गणित मराठा समाजाच्या लक्षात येत नाही, असे राज्यकर्त्यांना वाटते काय? मराठ्यांचे आरक्षण घटले आणि ओबीसींचे वाढले, हे कसे काय झाले असा प्रश्नही यावेळी मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. ओबीसी समाजाची संख्या साधारण 60 टक्के आहे. मराठा 34 टक्के, एससी, एसटीसह अन्य जातींचे प्रमाण 20 टक्के आणि मुस्लिमांसह इतर समाज असे मोजमाप केले तर हे प्रमाण दीडशे टक्क्यांवर जाते. एवढी लोकसंख्या आहे का, छगन भुजबळ आम्हाला वेडे समजतात का, असा टोलाही जरांगे यांनी लगावला.

भुजबळांची कारस्थाने फुसकी ठरली
छगन भुजबळांनी राज्यात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान रचले होते. परंतु आमच्या शांततेच्या भूमिकेने त्यावर पाणी फेरल्याचे मनोज जरांगे म्हणाले. आंतरवालीत आमच्यासमोर लोक उपोषणाला बसवून त्यांना दंगा करायचा होता. रॅली काढून वातावरण दूषित करायचे होते. बीड जिल्ह्यातील माझ्या गावात त्यांनी तरुणांची माथी भडकावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सगळे प्रयत्न फुसके ठरले, असे जरांगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याच्या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

अजूनही सरकारने विचार करावा
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासह सगेसोयर्‍यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 13 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा. नसता विधानसभेच्या निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.