टी-20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड यांचा कार्यकाळ संपूष्टात आला. त्यानंतर बीसीसीआयने टीम इंडियाचा धडाकेबाज माजी सलामीवीर गौतम गंभीरच्या खांद्यावर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे गौतम गंभीर आता अॅक्टीव मोडमध्ये आला आहे. गौतमने कोचींग स्टाफमध्ये माजी खेळाडूंना घेण्यासंदर्भात बीसीसीआयकडे मागणी केली आहे. या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्कलचे नाव आघाडीवर आहे.
गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सुत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर बीसीसीआयकडे कोचींग स्टाफमध्ये काही माजी खेळाडूंंना प्रशिक्षक म्हणून घेण्यासंदर्भात काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केलचे नाव आघाडीवर आहे. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, गंभीरने BCCI कडे मागणी करत मोर्ने मॉर्केलचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून विचार करण्यात यावा अशी मागणी केली आहे. गौतम गंभीर आणि मोर्ने मॉर्केलने आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स या संघासोबत एकत्र काम केले असून, लखनऊ संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सुद्धा त्याने काम पाहिलं आहे.
मोर्नी मोर्केलने 2006 ते 2018 या काळात दक्षिण आफ्रिकेकडून 86 कसोटी, 117 वनडे आणि 44 टी-20 सामने खेळले आहेत. तसेच मागच्या वर्षी हिंदुस्थानात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्याने पार पाडली आहे. मोर्नी मोर्केलव्यतिरिक्त गोलंदाजी प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत लक्ष्मीपती बालाजी आणि विनय कुमार यांच्या नावांचा सुद्धा समावेश आहे. त्याचबरोबर जहिर खानचे नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे.