मोदी यांच्या काळातच देशात सर्वाधिक आणीबाणी; ममता बॅनर्जी यांचा हल्लाबोल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. तसेच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत एकजूट असून ही एकजूट कायम राहील, असेही स्पष्ट केले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचा प्रचार करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

देशात सर्वात जास्त आणीबाणी मोदी यांच्या काळात सुरू आहे. त्यामुळे देशात आणीबीणी लागू झालेल्या 25 जूनला संविधान हत्या दिवस जाहीर करणे अयोग्य आहे. मोदी यांच्या काळातच आणीबाणीसारखे वातावरण आहे. नव्या संहितेच्या नावाखाली त्यांनी अनेक बदल केले आहेत. ते नेमके काय केले आहे, त्याची माहिती कोणालाच नाही. हे बदल करण्याची काय गरज होती. तसेच हे बदल करण्यापूर्वी कोणाशीही चर्चा करण्यात आली नाही. आम्ही आणीबाणीचे समर्थन करत नाही. मात्र, भाजपने स्वतःपासून याचा विचार करण्याची गरज आहे. आणीबाणीच्या काळात असे मनमानी निर्णय घेण्यात आले नव्हते. त्यावेळीही चर्चा करण्यात येत होती. मोदी यांच्या कार्यकाळासारखा मनमानी कारभार होत नव्हता, असा हल्लाही त्यांनी चढवला.

महाराष्ट्र आणि मुंबईला या मनमानी कारभाराची माहिती आहे. या सरकारने घेतलेले अनेक निर्णय राज्यातील जनतेला माहिती आहे. तसेच केंद्रातील सरकार स्थिर नाही, असेही त्यांनी सांगितले. राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या प्रचारासाठी येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता खेळा सुरू झाला आहे आणि तो चालूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही इंडिया आघाडीतच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमची एकजूट महत्त्वाची आहे, ती कायम राहणार असून त्याविरोधात एकत्र लढण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह चोरण्यात आले. तरीही उद्धव ठाकरे यांनी अत्यंत चांगल्याप्रकारे भाजपचा मुकाबला केला. त्यांनी अत्यंत चांगल्याप्रकारे नेतृत्व केले आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांच्याशी आमचे कौटुंबिक संबध आहेत. त्या इथे आल्या की आमची भेट होते. ही आमची कौटुंबिक भेट आहे, या भेटीत राजकीय असे काही नाही. आम्ही राजकीय किंवा इतर विषयांवर पत्रकार परिषद घेत मते किंवा भूमिका स्पष्ट करत असतो. ही कौटुंबिक भेट असल्याने यावेळी राजकीय भाष्य करणे योग्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.