दिल्ली विद्यापीठातील कायद्याच्या अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’ शिकवण्याच्या प्रस्तावावरून चांगलाच वाद पेटला आहे. विद्यापीठातील विधी शाखेने मनुस्मृती शिकवण्याबाबत दिलेला प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाने फेटाळून लावला आहे. या प्रस्तावाच्या निमित्ताने संविधानाच्या जागी मनुस्मृती आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेने या मुद्द्यावरून देशभरातील सर्व विद्यापीठाच्या आवारात तीव्र निदर्शने करणार असल्याचा इशारा दिला आहे. तर हा प्रस्ताव म्हणजे एकप्रकारे मागच्या दाराने संविधानाच्या जागी मनुस्मृती आणण्याचा डाव असल्याचा दावा करून काँग्रसने सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
मनुस्मृती समावेशाच्या प्रस्तावावर सर्वच स्तरांतून टीका झाल्यानंतर अखेर विधी शाखेचा प्रस्ताव धुडकावण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. या प्रस्तावावर शुक्रवारी ॲकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीत चर्चा होणार आहे. तत्पूर्वीच विद्यापीठ प्रशासनाने प्रस्ताव फेटाळला आहे.
कायद्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना ‘मनुस्मृती’ शिकवण्यासाठी तसेच अभ्यासक्रमात काही सुधारणा करण्यासंदर्भात विधी विद्याशाखेने प्रस्ताव पाठवला होता. विद्यापीठातील अभ्यासक्रमासंदर्भात अंतिम निर्णय देणाऱ्या समितीकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
प्रस्तावानुसार, मनुस्मृतीवरील दोन ग्रंथ, जी एन झा यांचे मेधातिथीचे मनुभाष्यासह मनुस्मृती आणि टी कृष्णस्वामी अय्यर यांचे मनुस्मृतीवरील भाष्य ‘स्मृतीचंद्रिका’ अशा दोन ग्रंथाचा समावेश अभ्यासक्रमात करण्याचा प्रस्ताव होता. विधी अभ्यास विभागाच्या डीन अंजू वाली टिकू यांच्या अध्यक्षतेखाली 25 जून रोजी झालेल्या प्राध्यापकांच्या अभ्यासक्रम समितीच्या बैठकीत या दुरुस्त्या सुचवण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.
या मंजुरीचं समर्थन करताना अंजू वाली टिकी या म्हणाल्या की, ‘हे ग्रंथ अभ्यासक्रमात घेण्यामागे हिंदुस्थानातील स्कॉलर्सची माहिती आजच्या पिढीला व्हावी, त्यांच्या ग्रंथांचे जे चुकीचे अर्थ लावण्यात आले आहेत ते चुकीचे आहेत त्यामागील खरा अर्थ पुढे यावा हा उद्देश होता’, असं त्या म्हणाल्या. त्यावेळी तर कुणी यास विरोध केला नव्हता. मात्र आता अचानक काही लोक जागे झाल्याची टीका त्यांनी केल्याचं इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटलं आहे.
काँग्रेसने या सगळ्या प्रकारावर जोरदार टीका करत हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव असल्याचं म्हटलं आहे. जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे ज्यात केंद्रातील सरकारला लक्ष्य करण्यात आलं आहे.