विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत असून पोलीस स्थानकात गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली असून अनिल देशमुख, नवाब मलिक यांना एक न्याय आणि गणपत गायकवाड यांना वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा सत्तेचा दुरुपयोग असून सत्ता कुठे कुठे पोहचते हे दिसतंय. आपण न्यायव्यवस्थेवर बोलू शकत नाही. पण एका वेगळा न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय हे स्पष्ट दिसतंय’, असे अंबादास दानवे म्हणाले.
आमदार गणपत गायकवाड आज निवडणूक आयोगाच्या परवानगीने मतदानाला विधान भवनात पोचले. केवळ आरोप असताना अनिल देशमुखांना यापूर्वी परवानगी नाकारण्यात आली होती. मग गायकवाड यांना पोलिस ठाण्यात गोळीबार करताना तर जगाने बघितले होते. आज निवडणूक आयोग भाजपचा सालदार झाल्याचे यातून दिसते.… pic.twitter.com/5MH8liJXRb
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 12, 2024
अनिल देशमुख यांच्यावर आरोप होते. पण गणपत गायकवाड हे स्वत:च्या रिवॉल्व्हरमधून गोळी झाडतात हे सगळ्या जगाने बघितलेले आहे. तरीही देशमुख यांना दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाला येऊ दिले नव्हते. पण आज गणपत गायकवाड यांना परवानगी देण्यात आली. हा सत्तेचा दुरुपयोग असून निवडणूक आयोग पक्षपाती आहे का? हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोग त्याचा बटीक, सालगडी असल्याप्रमाणे काम करतोय हे स्पष्ट होतंय, असा घणाघात दानवे यांनी केला.
सत्ता, पैसा त्यांच्याकडे; पण लोकमत आमच्याकडे, महायुतीचेही आमदार फुटू शकतात! – संजय राऊत
भाजकपडून सत्तेचा गैरवापर
दरम्यान, अनिल देशमुख यांनीही यावर परखड शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. दोन वर्षांपूर्वी तुरुंगात असताना मला मतदानाचा हक्क नाकारण्यात आला होता. पण आज होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी परवानगी मागितली आणि कोर्टाने त्यांना परवानगी दिलीही. एका आमदाराला एक न्याय आणि दुसऱ्या आमदाराला वेगळा न्याय का? त्यांनाही परवानगी नाकारली पाहिजे होती. भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला.