मला भेटण्यासाठी सोबत आधार कार्ड आणा! कंगनाचं फर्मान

नवनिर्वाचित भाजप खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत विविध विधानांवरून चर्चेत असते. आता कंगनाने तिच्या लोकसभा मतदारसंघातील म्हणजेच हिमाचल प्रदेशातील मंडीतील लोकांना तिची भेट घ्यायची असल्यास त्यांचे आधार कार्ड सोबत आणण्यास सांगितलं आहे.

पत्रकारांशी बोलताना कंगना म्हणाली की तिची भेट कोणत्या कारणासाठी हवी आहे ते कागदावर लिहावं लागेल. या मागील उद्देश सांगतना तिनं स्पष्ट केलं की भेटीचं कारण लिहून आणल्यास त्यांना कोणत्याही गैरसोयीला सामोरं जावं लागणार नाही.

‘हिमाचल प्रदेश पर्यटकांना खूप आकर्षित करतो, त्यामुळे मंडी भागाचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तुमचे मतदारसंघाशी संबंधित काम देखील पत्रात लिहिले पाहिजे जेणेकरून तुम्हाला गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही’, असं ती म्हणाली.

तिने असंही सांगितलं की जर हिमाचलच्या उत्तरेकडील लोकांना तिला भेटायचं असेल तर ते मनाली येथील तिच्या घरी जाऊ शकतात, तर मंडीतील लोक शहरातील तिच्या कार्यालयास भेट देऊ शकतात.

कंगना राणावतवर काँग्रेसचा हल्ला

मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना राणावतचे प्रतिस्पर्धी काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंग यांनी तिच्या या विधानावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते म्हणाले की जर लोकांना आपली भेट घ्यायची असेल तर त्यांना ‘आधार कार्ड आणण्याची गरज नाही’.