
सियाचीनमध्ये सहकाऱ्यांना वाचताना वीरमरण आलेल्या कॅप्टन अंशुमन सिंह याच्या कुटुंबीयांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किर्ती चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. किर्ती चक्र स्वीकारताना शहीद अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती हिचा व्हिडीओ आणि बाईट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे शहिदाच्या पत्नीबाबत लोकांचा आदर अधिकच वाढला होता. मात्र आता शहीद अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी एक धक्कादायक माहिती देत सुनेवर आरोप केला आहे.
शहीद अंशुमन सिंह यांची पत्नी स्मृती ही तिच्या पतीच्या फोटोंचा अल्बम, कपडे आणि इतर आठवणी व किर्ती चक्र घेऊन माहेरी गुरदासपूर येथे निघून गेली आहे. जाताना तिने फक्त शौर्य पदकच नेले नाही तर कागदपत्रांमधील स्थानिक रहिवासी म्हणून असणारा पत्ताही बदलून गुरदासपूर केला आहे. या सर्व आरोपांवर अद्याप स्मृतीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
शहीद अंशुमन सिंह यांचे वडील राम प्रताप सिंह यांनी ‘आज तक’शी बोलताना मुलाच्या मर्जीने मोठ्या धुमधडाक्यात स्मृतीसोबत लग्न लावून दिल्याचे सांगितले. आम्ही खुप धुमधडाक्यात आणि आशेने लग्न लावून दिले होते. लग्नात ना आमच्याकडून ना स्मृतीच्या कुटुंबीयांकडून काही कमी राहिली नव्हती. आम्ही सर्व खुप आनंदात होतो. लग्नानंतर स्मृती नोएडामध्ये बीडीएसचे शिक्षण घेत होती आणि माझ्या मुलीसह एका फ्लॅटमध्ये रहात होती, अशी माहिती राम प्रताप सिंह यांनी दिली.
19 जुलै 2023 रोजी आमचा मुलगा शहीद झाला. तेव्हा सून आणि मुलगी नोएडातच राहात होती. मीच फोन करून त्यांना कॅबद्वारे लखनऊला बोलावले आणि तिथून आम्ही गोरखपूरला गेलो. तिथेच मुलाच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार झाले. परंतु तेराव्यानंतर पुढच्याच दिवशी सुनेने माहेरी जाण्याचा हट्ट धरला. स्मृतीच्या वडिलांनी तिच्यापुढे पूर्ण आयुष्य पडल्याचे म्हटले. त्यावेळी आम्ही स्मृती आमची सून नसून मुलगी आहे आणि तिची इच्छा असेल तर पुन्हा लग्न लावून देऊ असे म्हटल्याचे राम प्रताप सिंह सांगितले.
View this post on Instagram
पण तेराव्यानंतर पुढच्याच दिवशी स्मृती आपल्या आईसोबत नोएडाला गेली. नोएडाच्या फ्लॅटमधून तिने आमच्या मुलाशी संबंधित सर्व गोष्टी, त्याचे फोटो, लग्नाचा अल्बम आणि इतर कागदपत्र घेऊन माहेर गाठलं. नोएडाहून मुलगी घरी आली तेव्हा आम्हाला ही गोष्ट कळाली. आमच्या मुलाला किर्ती चक्र मिळाले आणि ते स्वीकारण्यासाठी आई व सून दोघेही गेलेले. राष्ट्रपतींनी आमच्या मुलाला किर्ती चक्र दिले, पण मला ते हातात घ्यायलाही मिळाले नाही, असा आरोप राम प्रताप सिंह यांनी केला.
सरकारने शहीद अंशुमन सिंह यांच्या आठवणीत त्यांची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही सुनेला मेसेज केला. तिच्या वडिलांनाही कळवले की कमीत कमी मूर्ती अनावरणावेळी तरी मुलाचे किर्ती चक्र घेऊन ये, मात्र आम्हाला काहीही उत्तर मिळाले नाही. आता तर सुनेने मुलाच्या नावावरील सिम कार्डही बदलले आहे. त्याचा स्थानिक पत्ताही बदलला. त्यामुळे भविष्यात त्याच्याशी संबंधित काही कागदपत्र किंवा इतर सरकारी पत्रव्यवहार झाला तर त्याचा आम्हाला थांगपत्ताही लागणार नाही, असेही ते म्हणाले.