मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार! मुंबईकरांची तारंबळ

जुलै महिन्यातील मुंबईच्या पावसाचं वर्णन म्हणजे मुसळधार अशा एकाच शब्दात करता येतं. शुक्रवारी पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात अशाच जलधारा कोसळू लागल्या आहेत. यामुळे कामासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच तारंबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर इतका आहे की छत्री, रेनकोट असूनही अक्षरश: लोक भिजून गेल्याचं पाहायला मिळत आहे.

पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसाचा पहिला फटका बसला आहे तो मुंबईची लाइफ लाइन रेल्वे सेवेला. मुंबईची मध्य आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा 15 ते 20 मिनिटे उशिरानं सुरू आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला गंतव्यस्थानी पोहोचण्यास उशीर होत आहे.

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी असाच पाऊस कोसळत असल्यानं मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आणि मुंबईकरांची दाणादाण उडाली. शाळा – महाविद्यालयांनी वेळेवर सुट्टी जाहीर केली तर काही शाळांनी ऑनलाइन वर्ग घेतले होते.

विमान सेवा अद्याप सुरळीत पण…

इंडिगो विमान कंपनीने प्रवाशांना एक संदेश दिला आहे. विमान सेवेला अडथळा होण्याची शक्यता लक्षात घेत त्यांच्या विमानाच्या उड्डाणाच्या वेळेच्या अपडेट कडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

‘मुंबईतील मुसळधार पाऊस आणि हवाई वाहतूक कोंडीमुळे उड्डाणे प्रभावित होतात. फ्लाइटच्या स्थितीवर लक्ष ठेवा’, असे इंडिगोने X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

गेल्या सोमवारी, मुंबई शहर आणि उपनगरात तब्बल 300 मिमी पावसाची नोंद झाली, ज्यामुळे सर्व वाहतूक सेवांवर आणि रहदारीवर परिणाम झाला होता.