‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’चा फॉर्म भरताना अंगणवाडी सेविकेचा हार्टअटॅकने मृत्यू

देगाव (वाळूज) येथील अंगणवाडी क्रमांक- 1 च्या सेविकेचे शासनाच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा फॉर्म भरत असताना अंगणवाडीतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. सुरेखा रमेश आतकरे (48) असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.

सध्या गावोगावच्या अंगणवाडी सेविकांवर ‘मुख्यमंत्री – लाडकी बहीण’ योजनेचा सर्व्हे करून फॉर्म भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने दिलेली आहे. अंगणवाडी सेविका गावात घरोघरी फिरून तसेच कार्यालयात ‘नारी दूत’ या अॅपवरून फॉर्म भरीत आहेत. देगाव (वाळूज) येथील अंगणवाडी क्रमांक-1 येथे मृत सुरेखा आतकरे या बुधवारी गावात फॉर्म भरत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्या खुर्चीतच कोसळल्या. मदतनीस महिलेने त्यांना तत्काळ उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.