
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आज मुंबईत दाखल झाल्या असून उद्या त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोदी-शहांना दणका दिला, तर पश्चिम बंगालमध्ये ममतांनी भाजपला हिसका दाखवला. या निवडणुकीनंतर ममता प्रथमच मुंबईत आल्या असून या दौऱ्याबाबत खुद्द ममतांनीच प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली नव्हती. मी उद्या मुंबईत असल्याने या दोन्ही नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेईन. अर्थात, या भेटीत राजकीय चर्चाही होईल, असे ममतांनी नमूद केले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही उद्या मुंबईत आहेत. त्यामुळे त्यांचीही भेट होईल, असे ममतांनी सांगितले.