
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वादग्रस्त तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांना राज्य शासनाने निलंबित केले आहे. प्रशांत बेडसे हे सध्या पुणे जिह्यातील खेड तालुक्याचे तहसीलदार आहेत.
मोहोळ येथे काम करीत असताना त्यांनी अनेक प्रकारची बेकायदेशीर कामे केली असल्याचा ठपका शासनाने ठेवला आहे. मोहोळ येथील त्यांची चौदा महिन्याची कारर्किद वादग्रस्त ठरली. या काळात काम करीत असताना खोटे व चुकीचे आदेश देऊन महसूल, दप्तरी नोंद करणे, वारस नोंद, गट विभाजन, खरेदी दस्त नोंदणी, नवीन शर्त प्रकरणे, शेतीच्या बांधावरील रस्त्याचे न्याय निवाडे करताना पक्षपातीपणा करून लाचेची मागणी करणे, धरणग्रस्ताच्या पुनर्वसनाचे खोटे आदेश काढणे, अशा प्रकारच्या तक्रारी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या होत्या.
या संदर्भात आमदारांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करून प्रश्न मांडला होता. शासनाकडे आलेल्या अनेक तक्रारींवरून सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच पुणे विभागीय आयुक्त यांनी विशेष चौकशी समिती नेमणूक करून तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावरील दोषारोप अहवाल शासनाकडे पाठवला होता.
दरम्यान, नागपूर विभागीय आयुक्त व चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनीही बेडसे यांच्या वादग्रस्त कारभाराची चौकशी करून शासनास अहवाल सादर केले होते. महाघोटाळेबाज व वशिलेबहाद्दर प्रशांत बेडसे हा मिंधे सरकारमधील मंत्र्याची मध्यस्ती करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान, अव्वल सचिव संजू राणे यांनी तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.