खासगी मोटारीवर लाल दिवा; प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर पोलीस कारवाईच्या कचाटय़ात

खासगी मोटारीवर लाल दिवा लावून नियमाचा भंग केल्या प्रकरणी प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर पोलीस कारवाईच्या कचाटय़ात सापडल्या आहेत. वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी 21 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पूजा खेडकर यांनी खासगी मोटारीवर लाल दिव्याचा वापर केल्याचे उघडकीस आले. तसेच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील केबीनचा बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिकाऱ्याने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात शासनाकडे अहवाल पाठवून तक्रार केली होती. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने चतुःशृंगी पोलिसांचे पथक खेडकर यांच्या बाणेरच्या निवासस्थानी गुरुवारी पोहोचले. पोलिसांनी खेडकर कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

आईकडून माध्यम प्रतिनिधींना धमकी

 वाहनावरील दिव्या संदर्भात कारवाईबाबत पुणे पोलिसांचे पथक गुरुवारी खेडकर यांच्या घरी गेले होते. त्या वेळी माध्यम प्रतिनिधींकडून वार्तांकन करण्यात येत होते. पूजा खेडकर यांच्या आईने माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेऱ्याकडे हात करून मी तुम्हाला जेलमध्ये टाकेन, अशा प्रकारची धमकी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.