राजकीय पक्षांमधील संवाद हरपलाय, भाषणाची पातळी खालावलीय! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची खंत

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज विधानसभेत राज्यातील आमदारांना मार्गदर्शन केले. सध्या संसद आणि विधिमंडळाचे कार्य सुरळीत नाही, राजकीय पक्षांमधील संवाद हरपला आहे आणि भाषणाची पातळीही खालावली आहे, अशी खंत व्यक्त करतानाच, सभागृहाची बदनामी होईल असे काहीही करू नका, असा सल्ला धनखड यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्र विधान परिषदेचा यंदा शताब्दी सोहळा आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संबोधित करणे हे विशेष आहे, असे यावेळी उपराष्ट्रपती धनखड म्हणाले. उपराष्ट्रपतींनी यावेळी महाराष्ट्रभूमीवर स्तुतिसुमने उधळली. समृद्ध इतिहास, चैतन्यदायी संस्कृती आणि गतिमान अर्थव्यवस्थेसह महाराष्ट्र राज्य हे सर्वांसाठी एक प्रेरणा आहे. महाराष्ट्र हे आज देशाला नव्या उंचीवर नेणारी महाशक्ती आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र ही बलिदानाची भूमी आहे, या महान पुण्यभूमीत आल्यावर आपल्याला एक गीत आठवते, असे सांगत उपराष्ट्रपती धनखड यांनी, ‘इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की’ या गीतातील महाराष्ट्राची प्रशंसा करणाऱया ओळीही ऐकवल्या. देशाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांविना अधुरा नाही तर रिकामा वाटतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मराठा स्वराज्याची तत्त्वे, विपेंद्रित राजकारण, योग्यता, कायद्याचे राज्य, आर्थिक विकास आणि लोककल्याण यांना प्रशासकीय चौकटीत समाविष्ट करून, जगभरातील सार्वजनिक सेवा वितरणात अधिक कार्यक्षमता आणता येऊ शकेल, असे ते म्हणाले.