मुसेटी भिडणार जोकोविचला, पाच सेटच्या संघर्षात फ्रिट्झचा केला पराभव

पाच सेट आणि साडेतीन तास रंगलेल्या संघर्षात इटलीच्या लोरेंझो मुसेटीने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचा 3-6, 7-6(7-5), 6-2, 3-6, 6-1 असा पराभव करत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या उपांत्य फेरीत प्रथमच धडक मारली. आता मुसेटीला टेनिस किंग नोव्हाक जोकोविचशी भिडावे लागणार आहे तर दुसरा उपांत्य सामना डॅनिल मेदवेदेव आणि कार्लोस अल्काराझ या दिग्गजांमध्ये खेळला जाईल. महिलांच्या एकेरीत इटलीच्या जास्मिन पाओलिनीने क्रोएशियाच्या दोना वेकीचला हरवत उपांत्य फेरी गाठली.

आजचा दिवस इटलीसाठी खूपच चांगला गेला. एकीकडे पाओलिनीने 2-6, 6-4, 7-6 (10-8) अशा संघर्षमय लढतीत वेकीचला नमवण्याचा पराक्रम केला तर दुसरीकडे लोरेंझोने पहिला सेट गमावल्यानंतर पुढील दोन्ही सेट जिंकत सामन्यावर आपली पकड निर्माण केली, पण चौथ्या सेटमध्ये पुन्हा एकदा फ्रिट्झने बाजी मारत सामना रोमहर्षक स्थितीत नेला. अखरे लोरेंझोने पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये फ्रिट्झला 6-1 असे सहज चकवले. त्याआधी आणखी एका उपांत्यपूर्व सामन्यात मेदवेदेवने अग्रमानांकित यानिक सिनरचा पाच सेटच्या लढतीत पाडाव केला होता.

जोकोविच विक्रमाच्या दिशेने

नोव्हाक जोकोविचने आतापर्यंत 24 ग्रॅण्डस्लॅम जिंकत पराक्रम केलाच आहे. आता तो रौप्य महोत्सवी ग्रॅण्डस्लॅम जेतेपदापासून केवळ दोन विजय दूर आहे. ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धांच्या इतिहासात आजवर एकही टेनिसपटू जेतेपदांची पंचविशी गाठू शकलेला नाही. जोकोविचला तो विक्रम स्वतःच्या नावावर करण्याची नामी संधी यावेळी प्राप्त झाली आहे आणि तो लोरेंझोला नमवत त्या दिशेने आपले आणखी एक पाऊल टाकेल.