समृद्धी महामार्गाला भ्रष्टाचाराच्या भेगा, नाना पटोले यांचा आरोप

55 हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्या भ्रष्टाचारामुळेच या महामार्गाला वर्षभरातच भेगा पडल्या, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी समृद्धी महामार्गाच्या दुरवस्थेवरून मिंधे सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. समृद्धीच नव्हे, तर मुंबई-नवी मुंबईला जोडणाऱया 18 हजार कोटी रुपयांच्या ‘अटल सेतू’लाही भेगा पडल्याचे आम्ही उघड केले होते, असे पटोले म्हणाले. समृद्धीला भेगा, अटल सेतूला भेगा यातून मोदींची गॅरंटी किती तकलादू आहे हे स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले.

सरकारने विधिमंडळात मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जाणीवपूर्वक चर्चेत आणला. वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीस यांनीच 2014 साली धनगर व मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करण्याची त्यांची जबाबदारी आहे, पण केंद्रात व राज्यात भाजपचे बहुमताचे सरकार असतानाही केवळ विरोधकांवर कुरघोडी करायची यासाठी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घातला, असे पटोले म्हणाले.